गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

गणेश रूप

 रूप
****
पाहता सुंदर रूप मनोहर
हर्ष अनिवार मनी दाटे ॥
लोभस साजरी मूर्ती गणेशाची 
बटू बालकाची कांतीमान ॥
शुभ्र मोत्यासम असे एकदंत 
कृपा वक्रतुंड मुखावरी ॥
निळसर शेला पीत पितांबर 
लेणी देहावर सुवर्णाची ॥
कटीसी मेखला हातात कंकण 
पायात पैंजण रुणझुण ॥
योगिया दुर्लभ भक्तासी सुलभ 
प्रेमाचे वालभ मुर्त असे ॥
रूप पाहूनिया हरपले भान 
मन झाले लीन पायी तया ॥
विक्रांत हृदयी नित्य विनायक 
पाहतो कौतुक भक्तीचे हे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...