****
जरी जीव खुळा उतावीळ होता
कुणासाठी तरी टाळल्या मी वाटा
कुणासवे तरी थांबलो बोलता
मनात असंख्य असून कविता
कुणा सवें झालो तटस्थ उदास
कोरडी करून डोळ्यातील आस
असेल कुठल्या जन्माचे हे देणे
अथवा पुढे हे ऋण मी फेडणे
किती सोडवल्या बसलेल्या गाठी
नच येवू दिले नाव ते ही ओठी
परी कानी येती कुठले हे सूर
विराण एकांती उरी का काहूर
सुटूनिया गेले गाव दूरवर
तरी खुणावती वाटा का धूसर
हालती सावल्या मनात दडल्या
चाहुली वाचून भोवती दाटल्या
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा