मंगळवार, २५ मार्च, २०२५

बधिरता

बधिरता
****
कळत नाही विषण्णता मरणाची 
कशी विसरतो माणूस  
लगेचच
बाहेर पडता पडता
फाटकातून स्मशान भुमीच्या

सुरु होतात त्याच वार्ता नेहमीच्या
घरादाराच्या ऑफिसच्या  
पार्टीच्या पिकनिकच्या 
तर कुणी विचारतो एकमेकांना
जागा बसायच्या 
त्या गेलेल्या व्यक्ती प्रति
आदर असूनही 
ही अशी अवतरणारी 
हि उदासीन बधीरता
खरी आहे की खोटी आहे 
मला कधीच कळले नाही

हि स्थितप्रज्ञता नाही हे तर निश्र्चित कळते 
तर मग काय कारण मीमांसा असावी याची

कदाचित अज्ञाताचा दारावर 
डोके आपटून आलेली 
उद्दिग्न कठीणता
वा भोगात लोभात विखुरलेली 
बहिर्गामी मानसिकता .
का एक व्यवहारीक 
सामाजिक इतिकर्तव्यता 

खर तर ते  आपले 
शेवटचे प्रस्थान स्थळ पाहून 
व्हावे अंतर्मुख पुन: पुन्हा 
अर्थ जीवनाचा शोधावा पुन्हा 
ही क्रिया घडून येते आपसूक 
कुणी त्याला म्हणतात 
स्मशान वैराग्यही 
जे टिकते 
काही तास दिवस ही
पण  जर ते आले नाही तर
संवेदनशीलताच्या अध:पतनाचा
गंभीर प्रश्न उभा राहतो .
या समाजापुढे माणसापुढे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

द्वैत

द्वैत   ***** चंद्र चांदणे तुझेच होते  सुरेल गाणे तुझेच होते  मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या  असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...