अट
***
कधी शब्दावाचून कळते प्रीतकधी शब्दावाचून अडते प्रीत ॥१
करून दूर ते लाखो अडसर
मौन फुलांनी हळू भरते अंतर ॥२
नजर नजरेस भिडल्यावाचून
स्पर्शात झंकार उठल्यावाचून ॥३
आत कळते कुणा खोलवर
जीव जडला असे कुणावर ॥४
पण बंद वाटा कधी झाल्यावर
होय हरीणीची व्याकुळ नजर ॥५
जीवलग असे पैल तीरावर
प्रवाहाला नच दिसतो उतार ॥६
काय करावे ते नच कळते
स्वप्न समोर परि ना मिळते ॥७
त्या विरहाचे तप्त आर्त सुर
चांदण्यास ही करतो कापूर ॥८
वर्षा गीत ते ग्रीष्मास कळते
पळसही फुलतो उकलून काटे ॥९
होते पखरण ग्रीष्म फुलांची
नदी आटते जन्मों जन्माची ॥१०
पण ते गाणे व्हावे बहु कातर
जणू याचीच वाट पाहे चराचर ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा