मंगळवार, ४ मार्च, २०२५

नटपण

नटपण 
*******
स्टेज बदलते नाटक बदलते 
पात्र बदलतात प्रवेश बदलतात 
पण नट 
नट तोच असतो तसाच राहतो 
संवादात घुटमळलेला 
वेशभूषेत अडकलेला 
अन्  ते पाठांतर येते ओठी उगाच 
कुठून तरी कुठल्यातरी क्षणी 
जे पाहणार नसते ऐकणार नसते कुणी 
हे मनातील नाटक संपणे 
किती कठीण असते नाही.

खरंतर एकच नाटक 
तरी किती वेळ करायचे
जास्तीत जास्त रौप्य महोत्सव होणे 
म्हणजे खूपच झाले की
आता नवे नाटक नवे संवाद 
नवे पाठांतर हवे असते .

नवे नाटक गाजेलच असे काही नाही 
चालेलच असे काही नाही 
पण नटाचे नटपण स्वस्थ बसत नाही 
ते राहते नव्या संहिताच्या शोधात 
दिग्दर्शकला गळ घालत 
अन् घेऊ पाहते तोच गर्भ पिवळा 
सोनेरी प्रकाश झोत अंगावर 
तो जिवंत असण्याचा आभास
हवा असतो त्याला आपल्या मनावर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita

https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बाबा

प्रिय बाबासाहेब  *********** कृतज्ञतेच्या किनाऱ्यावर येवुन  तुम्हाला करतो आहे मी अभिवादन  कुठलाही रंग कुठलाही झेंडा  हातात घेतल्...