स्पर्श
****
एक शब्द प्रिय मधु ओठातला गवतावरती दवबिंदू झाला
जीवनाचे गाणे अर्थ भरलेला
साऱ्या माळराना स्वप्न देत गेला ॥
एक स्पर्श मृदू निळ्या पावलाचा
पाऊलवाटेला स्वर्ग भास झाला
एक नवेपणा पुन्हा ये मातीला
खोल कातळाला पाझर फुटला ॥
एक सूर भिडे दूर आकाशाला
गजबजे उर धुंदी कल्लोळाला
कुठले हे तप आले रे फळाला
आनंद भेटला जणू उधानाला ॥
गंध चंदनाचा केशर भिनला
दाही दिशातून कोंदून भरला
स्वप्न गोकुळाचे पडे मथुरेला
व्याकुळ दिठीत प्राण आसावला ॥
अंतरी कुठल्या स्मरणाची माला
पट जणू काही मनी उघडला
पाहता पाहता पाणी आले डोळा
मंद परिमळ वेढून राहिला ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा