शुक्रवार, २८ मार्च, २०२५

हेड क्लार्क देशपांडें बाई (निवृत्ती निमित्त)

हेड क्लार्क देशपांडें बाई (निवृत्ती निमित्त)
******************
ज्यांना ज्योतिष्य शास्त्र थोडेफार माहित आहे त्यांना ठाऊकच असेल 
जश्या माणसाच्या पत्रिका असतात 
तश्याच देशाच्या गावाच्या इमारतीच्या 
आणि ऑफिसच्या सुद्धा पत्रिका असतात .
तर आपल्या या अगरवाल रुग्णालयाची 
एक पत्रिका आहे .
जिला एक साडेसाती चालू होती  
जी सहजासहजी संपत नव्हती
दाखवून अनेक नैवेद्य करून आरती 
आणि हतबल झाला होता
इथल्या पत्रिकेचा स्वामी .
अशावेळी यावा गुरु स्वस्थानी 
आणि सुधाकर रुपी चंद्राशी
त्याची व्हावी सुयोग्य युती 
मग साडेसातीचे परिणाम जावेत पूसून
तसे झाले देशपांडे बाई 
तुम्ही या ऑफिसमध्ये आल्यानंतर.
इथे काम करण्यापेक्षा काम करून घेणे 
फारच अवघड असते 
धूमकेतू गत वरून आलेली फर्मान
रिपोर्टची तातडी प्रश्र्नांची  सरबत्ती 
त्यांना उत्तरे देणे मोठी कसरतच असते 
.
 तुम्ही प्रामाणिक प्रयत्नाने सदविवेकबुद्धीने
आणि विघ्नहर्ताच्या कृपेने निभावले सारे
 जिंकलात अनेक लढाया 
केल्या अनेक वाटाघाटी तडीस नेले तह
नाठाळ आरेरावी उद्दाम सुभेदारां सोबत

खरंतर तो तुमचा पिंड नाही 
तरीही प्रत्येक अडचणीला सामोरे जात 
तुम्ही होता मार्ग काढत 
कुठे कुठे चकरा मारत 
कुणाकुणाला भेटत 
आपल्या पदाची स्वप्रतिष्ठेची पर्वा न करता 
तसे मी पाहिले तुम्हाला 
कधी कधी वैतागलेले शीणलेले 
आणि शून्यात हरवलेले 
पण प्रत्येक वेळी तुम्ही बाहेर पडला त्यातून 
फिनिक्स पक्षाप्रमाणे 
त्याच प्रामाणिक सदिच्छे सह 
कर्तव्याच्या जाणीवेसह 
भिडलात आपल्या कामाला 
मुन्सीपालटीत राहूनही 
मुन्सीपलाईज न होता काम करणे
खरंतर  एक तपश्चर्याच असते 
ती तुम्ही उत्तमरीत्या पार पाडलीत
.
माझ्यासोबत तुम्हीही होता 
मोजत निवृत्तीचे वर्ष महिने दिवस 
आणि ते साहजिकच होते 
तो दिवस आहे आज उजाडत 
डोक्यावरचा भार आहे उतरत 
आता उठणे पळणे लोकल पकडणे 
रिक्षा शोधणे याला आराम आहे
फाईल शोधणे रिपोर्ट उत्तर देणे 
याला विराम आहे 

पण एक फेरी प्रभादेवीची 
ती मात्र तशीच चालू राहील 
याची मला खात्री आहे 
तुम्हाला  उत्तमआरोग्य आणि
दीर्घआयुष्य लाभो 
हीच बाप्पाकडे प्रार्थना !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

द्वैत

द्वैत   ***** चंद्र चांदणे तुझेच होते  सुरेल गाणे तुझेच होते  मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या  असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...