विरह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

यमुना

यमुना 
*****
अव्यक्त यमुना तव डोळ्यातील 
ओढून मजला नेते दूरवर 

संभ्रम किंचित वेडी हुरहूर 
दिसे खिन्नता डोही खोलवर

मावळतीचा तो चंद्र धूसर 
घेऊन येतो उरात काहूर

हे तर घडले होते घडणार 
अटळ लिखित काळ पटावर 

नकोस शोधुस पुन्हा तीरावर 
पाऊल उठली मृदू वाळूवर 

पण विरहाची नको हळहळ
हि युगे इवली इवले अंतर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 
 

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

वाणतो


वाणतो
******
सोडून हात हा 
तू आता कुणाची 
सोडुन साथ ही 
तू आता स्वतःची ॥१॥

नव्हती कधीच 
गाठ बांधलेली 
चालता प्राक्तनी  
गाठ पडलेली ॥२॥

कुणाचे असे हे 
काही देणे घेणे 
तयालागी इथे 
असे हे भेटणे ॥३॥

घडे भेटणेही 
घडे सुटणेही 
उमलता कळी 
घडे पडणेही ॥४॥

परी जाहले हे 
गंधित जगणे 
वाणतो क्षणास 
त्या कृतज्ञतेने ॥५॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शनिवार, २५ जून, २०२२

कुणासाठी


कुणासाठी
*******
कुणासाठी कोण कधी 
काय इथे असते रे 
ज्याचे त्याचे जगणे हे 
ज्याचे त्याचे असते रे ॥

तिचा लोभ याच्यावरी
याचे प्रेम तिच्यावरी 
सुख होते कुण्या जीवा 
मोरपीस कुण्या उरी ॥

माझे प्रेम माझ्यावरी
तुझे प्रेम तुझ्यावरी 
मोहरून जाता मन 
गाणे येथे ओठावरी ॥

प्रेमासाठी द्वैत हवे 
सुखा हवे दुजेपण 
म्हणूनिया प्रेमा सदा 
शोधतसे वेडे मन ॥

प्रेमासाठी प्रेम कुणा 
काय कधी मिळते रे
सुरक्षित घर एक 
साऱ्या हवे असते रे ॥

मानु नका त्याला तसे
पण खरे असते रे 
सत्य पचवणे इथे
अरे सोपे नसते रे 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, १७ जून, २०२२

जीव

जीव
***:
तू सांगायचीस 
एक गोष्ट मला 
पोपटात जीव 
असलेल्या राक्षसाची
अन मी हसायचो 
म्हणायचो
असे कुठे असते का ?
एकाचा जीव 
दुसऱ्यात राहतो का ?
तू चिडायचीस रागावयाचीस 
अन म्हणायचीस  
आई कधीच खोटं बोलत नाही !

मग एक दिवस 
तू गेलीस दूर निघून  
घर शहर सोडून . .
तेव्हा मला पटले 
तुझी आई 
खरं तेच सांगायची 
एकाचा जीव 
दुसर्‍यात असतो ते !
राक्षसाचा जीव 
पोपटात असतो ते !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १२ जुलै, २०२०

येता अवसरू

येता अवसरू
++
दुःख भरले मनात 
ठेव भरून ओठात
नको येऊन देवूस
उगा आषाढ डोळ्यात 

नाती क्षणांची अवघी
कोण कुणाचेच नाही 
क्षण सुखाचे भेटले 
मान ऋण त्यांचे काही 

जन्म-मरण इथले 
कुणा आहे रे सुटले 
ताटातुटीत उद्याचे
बंध आहे रे बांधले 

काळ पुरुषाचा जरी 
कधी हीशोब चुकतो 
जाते हरवून धागे 
कधी पतंग फाटतो 

होते चुकामुक कधी 
कोण येतो पुढे पाठी 
चाले प्रवास हा प्राप्त 
काही नसतेच हाती 

गेले दूर त्या जाऊ दे 
नको अडवून धरू 
पुढे पडणार गाठी 
पुन्हा येता अवसरू

***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...