रविवार, १२ जुलै, २०२०

येता अवसरू

येता अवसरू
++
दुःख भरले मनात 
ठेव भरून ओठात
नको येऊन देवूस
उगा आषाढ डोळ्यात 

नाती क्षणांची अवघी
कोण कुणाचेच नाही 
क्षण सुखाचे भेटले 
मान ऋण त्यांचे काही 

जन्म-मरण इथले 
कुणा आहे रे सुटले 
ताटातुटीत उद्याचे
बंध आहे रे बांधले 

काळ पुरुषाचा जरी 
कधी हीशोब चुकतो 
जाते हरवून धागे 
कधी पतंग फाटतो 

होते चुकामुक कधी 
कोण येतो पुढे पाठी 
चाले प्रवास हा प्राप्त 
काही नसतेच हाती 

गेले दूर त्या जाऊ दे 
नको अडवून धरू 
पुढे पडणार गाठी 
पुन्हा येता अवसरू

***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...