बळी
**
धारधार शस्त्र
चाले मानेवर
देह धरेवर
मग पडे ॥
फिरलेले डोळे
श्वासाचे फुत्कार
प्राणाचा आधार
सुटू जाय ॥
होय तडफड
जगण्या देहाची
अडल्या श्वासाची
फडफड ॥
चार दांडगट
चार पायावर
भार डोईवर
देती घट्ट ॥
होय आक्रंदन
मल विसर्जन
थरथरे तन
शांत होय ॥
रक्ताचे थारोळे
चिकट गरम
जातसे गोठून
मिनिटात ॥
ऊर्जेचे भांडार
क्षणांचे सजीव
होऊन निर्जीव
पडे सुन्न ॥
मग खाटकाची
घाई सोलण्याची
उभ्या लाईनची
गर्दी मोठी ॥
कुणास कमर
कोणास तो सीना
कलिजा नि खिमा
घेतो कोण ॥
जाय दाही दिशी
देह अवयव
मारतात ताव
कोण कुठे ॥
माणसा पोटात
किती रे कबरी
अतृप्त चित्कारी
भरलेल्या ॥
कोण जन्मा आले
कोण कुठे मेले
कशास जगले
कळेचिना ॥
विक्रांत हत्तेची
होते भरपाई
जाणुनिया होई
कासावीस॥
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा