मित्र मृत्यू
********
मित्र साथीदार कलीग
आज जेव्हा होतो फोटो हार घातलेला
क्षणिकतेची शून्य अवकळा
येथे आपल्या मनाला
त्याची मिश्किल प्रेमळ नजर
उमटत असते पारदर्शी
पण अस्पर्श काचेतून
मनात साठले त्याचे शब्द
ऐकू येत असतात
फक्त आपल्याला आपल्या आतून
असंख्य स्मृती चित्रांची
मालिका उलगडत असते
निरंतर एक एका मागून
येण्या जाण्याचे सनातन सत्य
माहित असते मनाला
माहीत असते की कढ दुःखाचा
विसरून सामोरे जायचे जगण्याला
शोक सभेतील भंते सांगत होते
जगणे तोवरच असते
जोवर कारण असते जगण्याला
हे कारण अकारणाचे अकालनीय कोडे
उलगडत नव्हते मनाला
शेवटी तत्त्वज्ञान म्हणजे तरी काय
मलम लावणेच असते शोकाकुल मनाला
तुटलेल्या नात्याच्या विद्ध दशा
हातात घेऊन बसलेले प्रियजन
सुखदुःखात साथीदार असलेले मित्रगण
जगणार असतात एक पोकळी घेऊन
जी असते गिळून
अनंत सुखाच्या प्रेमाच्या
आनंदाच्या संभावनांना
फुलं तर सारीच पडतात
फळही गळून पडतात
पण कुणाचे अकाली ओघळणे
विद्ध करते मनाला कारण
त्या मित्रासोबत
आपणही असतो
खाली ओघळत
त्याच्यातला अंश होत.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा