मित्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मित्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

मित्र मृत्यू

मित्र मृत्यू 
********

कालपर्यंत शेजारी बसलेला 
मित्र साथीदार कलीग 
आज जेव्हा होतो फोटो हार घातलेला 
 क्षणिकतेची शून्य अवकळा 
येथे आपल्या मनाला 

त्याची मिश्किल प्रेमळ नजर 
उमटत असते पारदर्शी 
पण अस्पर्श काचेतून
मनात साठले त्याचे शब्द
ऐकू येत असतात 
फक्त आपल्याला आपल्या आतून 

असंख्य स्मृती चित्रांची
मालिका उलगडत असते
निरंतर एक एका मागून

येण्या जाण्याचे सनातन  सत्य 
माहित असते मनाला 
माहीत असते की कढ दुःखाचा 
विसरून सामोरे जायचे जगण्याला 

शोक सभेतील भंते सांगत होते 
जगणे तोवरच असते 
जोवर कारण असते जगण्याला 
हे कारण अकारणाचे अकालनीय कोडे 
उलगडत नव्हते मनाला 
शेवटी तत्त्वज्ञान म्हणजे तरी काय 
मलम लावणेच असते शोकाकुल मनाला 

तुटलेल्या नात्याच्या विद्ध दशा
हातात घेऊन बसलेले प्रियजन 
सुखदुःखात साथीदार असलेले मित्रगण 
जगणार असतात एक पोकळी घेऊन 
जी असते गिळून 
अनंत सुखाच्या प्रेमाच्या 
आनंदाच्या संभावनांना

फुलं तर सारीच पडतात 
फळही गळून पडतात 
पण कुणाचे अकाली ओघळणे 
विद्ध करते मनाला कारण
त्या मित्रासोबत 
आपणही असतो 
खाली ओघळत 
त्याच्यातला अंश होत.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

मैत्री


मैत्री
**:**
मैत्री एक झाड असते 
काही न मागणारे 
भरभरून देणारे 
जीवनाच्या वाटेवर 
सहजच भेटलेले 
व्यापार तडजोड 
स्वार्थावाचून
आपलेसे झालेले 

मैत्री हे आभाळ असते 
आषाढात दाटलेले 
साद घालताच मैत्रीने 
सर्वस्व देणारे 
अस्तित्व ते काय आपले
सत्वही समर्पित करणारे 

मैत्री हे चांदणे असते 
जणू की शरदातले 
अल्हादक मनोहर 
हवेहवेसे वाटणारे 
क्लेश दुःख ताण 
शोषून घेणारे 

मैत्री हे ऊन असते 
तप्त सुवर्ण  गोजिरे 
सर्वदा बळ देणारे 
जीवनाच्या प्रत्येक वळणावर 
सदा साथ देणारे 
प्रत्येक खड्डा प्रत्येक अडथळा 
अचूकपणे दाखवणारे 
नवनव्या स्वप्नांच्या
क्षितिजाकडे नेणारे 

मैत्री सांजही असते 
कट्ट्यावर भेटणारी 
हातात हात घालून 
गप्पागोष्टी करणारी 
खूपणाऱ्या वेदना 
अंतरंग उलगडणारी 
अन आपल्या मूर्खपणाला
जगजाहीर करणारी 
हसणारी हसवणारी 
डोळा पाणी आणणारी

खरं सांगायचे तर 
मैत्री हे वरदान असते 
एकाकी न रमते
असे म्हणणाऱ्या 
सर्वात्मकाने दिलेले 
ज्याला मित्र भेटती 
निखळ अन नितळशी 
मधुर मैत्री लाभते 
तेच या जगी भाग्यवान असती
खरोखर तेच भाग्यवान असती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

मैत्र

मैत्र
****

तुझ्या डोळ्यातले भाव 
मज कळत नाही 
गीत हिरव्या पानाचे 
कधी लहरत नाही ॥

वारा उधान पंखात 
नभ खुणावते काही 
पाय रोवले फांदीत 
का ग सुटत नाही ॥

जग नसते कुणाचे 
नाही आजचे उद्याचे 
शीड भरल्या वाचून 
नाव चालत नाही ॥

मी न नावाडी खलाशी 
सवे तुझ्या ग प्रवासी 
मैत्र क्षणाचे मनाचे 
वाट मोडत नाही ॥

रंग पुसून सुखाचे 
जरा हास खळाळत
क्षण वाहती काळाचे 
कधी थांबत नाही .॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

न्याय

न्याय ****** तीच न्याय संस्था फाशी सुनावते  तीच न्याय संस्था निर्दोषही ठरवते  व्यक्ती तीच असते  आरोपही तेच असतात  सुनावनी तशीच ह...