रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

मैत्री


मैत्री
**:**
मैत्री एक झाड असते 
काही न मागणारे 
भरभरून देणारे 
जीवनाच्या वाटेवर 
सहजच भेटलेले 
व्यापार तडजोड 
स्वार्थावाचून
आपलेसे झालेले 

मैत्री हे आभाळ असते 
आषाढात दाटलेले 
साद घालताच मैत्रीने 
सर्वस्व देणारे 
अस्तित्व ते काय आपले
सत्वही समर्पित करणारे 

मैत्री हे चांदणे असते 
जणू की शरदातले 
अल्हादक मनोहर 
हवेहवेसे वाटणारे 
क्लेश दुःख ताण 
शोषून घेणारे 

मैत्री हे ऊन असते 
तप्त सुवर्ण  गोजिरे 
सर्वदा बळ देणारे 
जीवनाच्या प्रत्येक वळणावर 
सदा साथ देणारे 
प्रत्येक खड्डा प्रत्येक अडथळा 
अचूकपणे दाखवणारे 
नवनव्या स्वप्नांच्या
क्षितिजाकडे नेणारे 

मैत्री सांजही असते 
कट्ट्यावर भेटणारी 
हातात हात घालून 
गप्पागोष्टी करणारी 
खूपणाऱ्या वेदना 
अंतरंग उलगडणारी 
अन आपल्या मूर्खपणाला
जगजाहीर करणारी 
हसणारी हसवणारी 
डोळा पाणी आणणारी

खरं सांगायचे तर 
मैत्री हे वरदान असते 
एकाकी न रमते
असे म्हणणाऱ्या 
सर्वात्मकाने दिलेले 
ज्याला मित्र भेटती 
निखळ अन नितळशी 
मधुर मैत्री लाभते 
तेच या जगी भाग्यवान असती
खरोखर तेच भाग्यवान असती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...