शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

सश्याची शिंगे

सश्याची शिंगे
********
रे या जगी सुखे त्यालाच मिळाली
सश्याची शिंगे ज्यांनी की पाहिली  ॥१॥

छान असतात गोड दिसतात 
सुख दावेदारअसे म्हणतात ॥२॥

तेव्हापासून मी त्या शोधू लागलो
रोज त्याची स्वप्ने ही पाहू लागलो  ॥३॥

रानीवनी दुकानी सार्‍या हिंडलो
देतो सांगा भाव ज्या त्यास बोललो  ॥४॥

पण ते सारे होते चलाख चोर 
आगावू घेवून जाहले पसार ॥ ५॥

त्राण हरवले धन गमावले  
सारे यत्न माझे ते वाया गेले॥६॥

जो तो मज विचारू हे लागला
शिंगाचा ससा काय हो मिळाला॥७॥

मी हि मग तया खूप कंटाळलो
हो भेटला उगाच म्हणू लागलो ॥८॥

तेव्हापासून त्या त्रासातून सुटलो
सुखात एक असा गणला गेलो  ॥९॥

पण त्या कधी न पाहील्या सश्याचे 
कौतुक जे का माझ्या वेड्या मनाचे॥१०॥
 
कधी ना सरले मनात रूजले
शोधती डोळे अजून न थकले ॥११॥

दत्ता शोध हा नसलेल्या गोष्टीचा  
सांग कधी थांबायचा विक्रांतचा ॥१२॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...