सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

कृष्ण स्मरण


कृष्ण स्मरण
***********

कृष्ण भक्तीचे अंगण
कृष्ण कृपेचे कारण 
कृष्ण ज्ञानाचे सिंचन 
भगवत गीती ॥
कृष्ण कर्माची जाणीव 
कृष्ण योगाची राणीव 
कृष्ण प्रेमाची सोलीव 
मूर्त साकार ॥
कृष्ण मैत्रीचा आधार 
कृष्ण प्रीतीचा आकार 
कृष्ण कैवल्य साचार 
डोळ्यापुढती ॥
कृष्ण दुष्टांस वधिता 
कृष्ण भक्तांस रक्षिता 
कृष्ण धर्म संस्थापिता 
पुरुषोत्तम ॥
कृष्ण कुटील निर्मळ
कृष्ण जटिल मोकळ 
कृष्ण सलील आभाळ 
अपरंपार ॥
कृष्ण आकलना पार 
कृष्ण अध्यात्माचे सार 
कृष्ण काळजाची तार
भक्ताचिया ॥
कृष्णा सदैव भजावे 
कृष्णा हृदयी धरावे 
कृष्णा विना न राहावे 
क्षणभरही ॥
कृष्ण चरित्र सुगंध 
कृष्ण भक्तीचे अभंग 
कृष्ण जीवनाचा रंग 
अवघा व्हावा ॥
कृष्ण ठेवुनिया चित्ती 
मागे भक्तीसाठी भक्ती
अन्य नको या विक्रांती
काही देऊस॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...