श्रावणाची गाणी
***************"
तू श्रावणाची होत गाणी येतोस माझ्या मनी
ही रात्र अष्टमीची
भरलेल्या काळ्या ढगांची
नेहमीच घालते मला भूल
लाखो मनात दाटणारी
तुझ्या स्मृतीची सघन ऊर्जा
पोहोचते खोलवर माझ्या अणूरेणुत
अणूरेणूत असलेल्या अनंत पोकळीत
मग ती पोकळी जाते भरून
तुझ्या ऊर्जेनी
चैतन्याचे एक निळे निळे गगन
अवतरत असते त्यातून
ज्यात तूच असतोस अंतर्बाह्य भरून
हे कृष्ण हे गोपाळ हे नंदनंदन
हळूहळू ही नामावली ही
होत जाते क्षीण क्षीण
उरते फक्त एक गुंजन
कुणी तिला म्हणते बासुरीची धून
कुणी म्हणते प्राणाचे होणारे स्पंदन
तर कोणी म्हणते अनाहत श्रवण
कुठलीही मीमांसा न करता
त्या धूनी मध्ये मी जातो हरवून
अवघे देहभान हरपून
अन तू प्रगट होत असतोस
श्रावणाचे गाणे होऊन
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .