कृष्ण कळणे
**********
कृष्ण कुणालाच कळला नाही कधीच कळला नाही
कृष्ण कळला म्हणायची
कुणाची हिंमतच होत नाही .
जस जसे कृष्णाला कळू पाहते मन
जस जसे कृष्णाला न्याहाळू लागते मन
स्तिमित स्तब्ध होते अन
मौनात जावू लागते मन
अथांग सागराच्या मध्यावर जाणे
अन् त्या सागराला पाहणे असते ते
कणभर अस्तित्वाला घेवून
अथांग शून्यात हरवणे असते ते
तिथे दडपून जाते छाती
कंप सुटतो सर्वांगाला
ही भीती केवळ अर्जुनाची नसते
कृष्ण जाणवू लागल्यावर
वाटणारी प्रत्येकाचीच भीती असते ती
ती भीती असते अज्ञाताची
ती भीती असते अज्ञानाची
ती भीती असते संपण्याची
मग मागे उरते ते फक्त मौन.
आणि त्या मौनात दाटलेली शरणागती
तरीही कृष्ण कळत नाही
कारण कृष्ण कळणे शक्यच नसते.
पण मग या जाणीवेचा उद्गम
घेऊन जातो अहंकाराला शून्यात
तेव्हा क्षणभर भास होतो
मनाला कृष्ण रुपाचा
कणभर गंध येतो
अस्तित्वाला कृष्ण रुपाचा
तेवढेही खूप असते या देहाला मनाला
आणि या जन्माला !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .