नाम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

संताघरी


संता घरी
********
संता घरी धन नामाचे निधान 
घ्या रे घ्या मागून लाजू नका ॥१

संत वाटतात प्रेम श्रीहरीचे 
किती मागायचे मागा तुम्ही ॥२

हाका मारती ते देण्यास बैसले 
धावा रे धावा रे धावा तिथे ॥३

सोन्याची दगडे हिरा काचखडे 
मातीचे तुकडे मागू नका ॥४

कीर्तीची क्षणिक फुले सुकणारी 
यश ही भाकरी दुसऱ्याची ॥५

असे व्यर्थ धन उगाच मागून 
बघा रे नुकसान करू नका ॥६

विक्रांता दावली चैतन्यांनी वाट 
आता माझा थाट पुसू नका ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

मरण स्मरण


मरण स्मरण
**********

घडे मरण स्मरण होते विरागी हे मन
येता विरक्ती दाटून ठके पाप आचरण 

पाप थांबता थांबता आत जागे सद्वासना 
शुद्ध होताच वासना येई परमार्थ मना

येता परमार्थ ध्यानी मन लागते रे नामी 
मन लागताच नामी होय भगवंत प्रेमी 

प्रेम भगवंती आले अनुसंधानी रमले 
नाम रंगात भिजले चित्त शुद्धतम झाले 

चित्त शुद्धी ती घडता मना साधे एकाग्रता 
मन एकाग्रे जडता काम सरले जगता

ब्रहमचैतन्य वचन ठेवा मरण स्मरण 
हीच पायरी प्रथम असे परमार्थ सोपान

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

निर्मळ मन

निर्मळ मन
*********
धरून हातात संताचा तो हात 
नाम गंगा काठ पहावा रे 
घ्यावी ओंजळीत सांगती ते नाम 
तेणे  तुझे काम होईल रे 
ओंजळी ओंजळ लाग ते गोडी
 मग घेई उडी तया माजी
शिरता प्रवाही नुरेल हा देह 
नामाचेच गेह होईल रे 
जातील वासना अवघ्या कामना 
भाग्याचा देखाणा मुर्त होसी
निर्मळ मनात येतो भगवंत 
सांगतात संत आवर्जून 
विक्रांत धरी ते शब्द हृदयात 
नाम ओंजळीत सुख वाटे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

अनुसंधान


अनुसंधान
********

अनुसंधान हा देहभाव व्हावा 
नच विसरावा कदा काळी ॥१

चालता बोलता हसता खेळता 
जेवता निजता स्थिरपणे ॥२

जैसी माय नच विसरे पदरा
देह मन घरा वावरता ॥३

डोईवर घडा घडा घड्यावर 
पाणी पथावर नच पडे ॥४

घडतात कर्म अचूक सहज 
परि चित्त निज साधनात ॥५

सांगती विक्रांता श्री ब्रह्मचैतन्य 
मिळवणे काय नाम जपे ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

मूळपीठ



मूळपीठ
*******

दत्त तोच हरी.
तोच गणपती 
नाम त्याची मुर्ती 
सनातन ॥

 रूप आवडीचे
नाम आवडीचे
स्मरता तयाचे 
प्रेम वाढे ॥

अन्यथा भेदाचे 
नाहीच ते काम
म्हणा राम राम 
दत्त भजा ॥

तरी तोच दत्त 
होवुनिया राम 
पुरवितो काम 
सकल रे ॥

सदगुरू सांगे 
तेच नाम धर 
शब्द ते ईश्वर 
अन्य नाही ॥

नामानुसंधान
नादानुसंधान
आत्मानुसंधान 
एक तेच ॥

विक्रांता दाविले 
दत्तात्रेये नीट 
भक्तीची हि रित
उकलून ॥

नामची ओंकार
शब्द शब्दातीत
शुद्ध मूळपीठ
मातृकांचे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


न्याय

न्याय ****** तीच न्याय संस्था फाशी सुनावते  तीच न्याय संस्था निर्दोषही ठरवते  व्यक्ती तीच असते  आरोपही तेच असतात  सुनावनी तशीच ह...