संत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

संतांचे दर्शन

संतांचे दर्शन
**********

संतांचे दर्शन संताचीच कृपा 
बाकी अर्थ नसे काही खटाटोपा 

संत बोलावती तेव्हा घडे जाणे
अन्यथा घडते नित्याचे जगणे 

कुणा घडे रोज कुणाला क्वचित 
भाग्य वा प्रारब्ध तयात खचित 

आपल्या हातात असते भजने 
त्यांनी जे दिले ते तसे जगणे 

तया चैतन्याचा दिवा हृदयात 
विक्रांत निवांत ठेवतो तेवत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

संताघरी


संता घरी
********
संता घरी धन नामाचे निधान 
घ्या रे घ्या मागून लाजू नका ॥१

संत वाटतात प्रेम श्रीहरीचे 
किती मागायचे मागा तुम्ही ॥२

हाका मारती ते देण्यास बैसले 
धावा रे धावा रे धावा तिथे ॥३

सोन्याची दगडे हिरा काचखडे 
मातीचे तुकडे मागू नका ॥४

कीर्तीची क्षणिक फुले सुकणारी 
यश ही भाकरी दुसऱ्याची ॥५

असे व्यर्थ धन उगाच मागून 
बघा रे नुकसान करू नका ॥६

विक्रांता दावली चैतन्यांनी वाट 
आता माझा थाट पुसू नका ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

संत शरण


संत शरण
*********
जावे संताला शरण । तेच करती निदान ।।

भवरोग ओळखून । करतात निवारण ।।

काय कुणाची चुकले । दोष कुठे ते मुरले ।।

नीट पाहाती कृपेने । बरे करती साधने ।।

कोण मोहाने दाटले । कुणा कामने गिळले ।।

कोण क्रोधात जळले । मद मत्सरे पिडले ।।

अति कुशल नेमके । मधु नीटसं मोजके ।।

देती पथ्य आवडते । व्याधी समूळ ती जाते ।।

विक्रांत संताचा ऋणी।  दवा दिली रे बांधुनि।।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

निर्मळ मन

निर्मळ मन
*********
धरून हातात संताचा तो हात 
नाम गंगा काठ पहावा रे 
घ्यावी ओंजळीत सांगती ते नाम 
तेणे  तुझे काम होईल रे 
ओंजळी ओंजळ लाग ते गोडी
 मग घेई उडी तया माजी
शिरता प्रवाही नुरेल हा देह 
नामाचेच गेह होईल रे 
जातील वासना अवघ्या कामना 
भाग्याचा देखाणा मुर्त होसी
निर्मळ मनात येतो भगवंत 
सांगतात संत आवर्जून 
विक्रांत धरी ते शब्द हृदयात 
नाम ओंजळीत सुख वाटे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

संतसंग

 संत
****

झालास पतित वासनेत रत
 घडले अहित वेळोवेळा ॥

कृपाळू ते संत माऊली मनाचे
देतील दयेचे परि हात ॥

बाहेर काढती सुस्नान घालती 
आणि हाती देती नामकाठी ॥

कधी रागावती पोटाशी धरती 
हाती भरवती घास मुखी ॥

विश्वहितीरत तयांचे हृदय 
क्षमा अवयव जणू  काही॥

विक्रांत तयांची घेई पायधुळ 
सोयरे सकळ हेचि माझे॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

साधू भेटी


साधू भेटी
*******

थोर या जगती
किती ऋषीमुनी
देवाला पाहुनी 
पूर्ण झाले ॥१

परी तयांची ती 
पडेनाची गाठी 
मिटेनाच‌ भ्रांती 
जीवनाची ॥२

भेटून कधी ते 
नच रे भेटती 
उदास वागती 
जगण्यात ॥३

कधी पोहोचणे 
देहा न घडते 
काय आड येते 
कुणा ठाव ॥४

विक्रांत दत्ताला 
मागतो मागणे 
घडू दे भेटणे 
तया सवे ॥५

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...