पांडुरंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पांडुरंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव 
*********
रूप ज्ञानदेव घेऊनिया आले 
आळंदी बैसले पांडुरंग ॥

देवभक्त रूपे करतो सोहळा 
द्वैताचा आगळा प्रेममय 

देव स्वतःलाच भजतो प्रेमाने 
लीलेत रमणे आवडे त्या 

प्रेमभक्तीविना निर्गुण एकटे 
रिकामटेकडे अर्थहीन 

द्वैत अद्वैती हा घडतात खेळ 
विश्व चळवळ गोड चाले 

अगा पांडुरंगी दिसे ज्ञानदेव
अन्य नाही भाव विक्रांती या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १७ जुलै, २०२५

पदस्पर्श

पदस्पर्श
*******
तुझ्या पायावरी ठेवीला मी माथा 
अजूनही खरे न वाटते या चित्ता

रुजुनिया स्पर्श हुळहुळे भाल
 स्तब्ध झाले मन यंत्रवत चाल 

अगा त्या पदात स्पर्श ज्ञानदेव 
 तुकाराम एकनाथ नामदेव 

आणिक कित्येक संत भागवत 
अनंत भाविक कोटी कोटी भक्त

जुळलो तयांशी एकतान होत
सुख दाटूनिया आले अंतरात

साऱ्या पंढरीत झालो भाग्यवंत
 लोटली रे युगे एका त्या क्षणात

विक्रांत कृतार्थ भेटली पावुले 
पंढरीचे सुख मज कळू आले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ९ जुलै, २०२५

दर्शन हेळा मात्रे

दर्शन हेळा मात्रे
************
पायावरी माथा होता
माथेकरी कुठे होता 
क्षण काळ हरवला 
क्षण सर्वव्यापी होता ॥
युगे युगे म्हणतात 
हरवले ते क्षणात 
ओळख की अनोळख 
विचारता कुठे होता ॥
मनपण हरवले 
देहाचेही भान गेले 
जणू शून्य साठवले 
जरी पाठी धक्का होता ॥
सावळीच मूर्ती परी 
कोंदाटली आभा होती 
कुणा ठाव काय इथे 
स्पर्श परिसाचा होता ॥
काही देही कोसळले 
काही चित्ती उमटले 
एक मिती उघडून 
कुणी तो हसत होता ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...