बोले देव आळंदीचा
***************
प्रेमबळे बोले देव आळंदीचा उधळीत वाचा ज्ञान फुले ॥
शब्द प्राजक्ताचे शब्द चांदण्याचे
शब्द लावण्याचे रूप जणू ॥
गायन कुसरी साज शब्दावरी
अर्थ मनावरी राज्य करी ॥
हरवले प्रश्न अवघ्या जनाची
मने वैष्णवांची तीर्थ झाली ॥
मोक्ष एक एका घेई कडेवरी
भक्ती गालावरी तीट लावी ॥
अवघा अपार लोटला आनंद
नंद ब्रह्मानंद मूर्त रूप ॥
ओलांडून काळ जन्म हा धावतो
कणकण होतो ज्ञानदेव ॥
पानोपानी दिसे चित्र हे देखणे
विक्रांत पाहणे धन्य झाले ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .