भक्तीगीत अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भक्तीगीत अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

मी दत्त गीत गातो

दत्तगीत गातो
*************
दत्तप्रिय होण्या मी दत्तगीत गातो
प्रेम वाढवतो मनातील ॥१

शब्दाच्या गाभारी शब्द उधळतो 
प्रेमे ओवाळीतो अवधूता ॥२

जमवून शब्द दत्ता सजवितो 
आणिक मागतो हेचि दान ॥३

इवल्या साधने होई गा प्रसन्न 
होऊनिया मन राही माझे ॥४

चालवी या मना वदवी वदना 
मिटो माझेपणा मायामय ॥५

मागावया श्रेष्ठ काय अन्य इथे 
तयाहून गोमटे नाही जगी ॥६

विक्रांत खेळणे दत्त हातातले
सूत्रे चालवले उरो फक्त ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १६ जून, २०२५

देई भक्ती मन

देई भक्त मन
******
जयघोष तुझा दत्ता
गुणगान मी करीन
जीवाचे हे लिंबलोण 
तुजवरी ओवाळीन ॥१

देहाची या कुरवंडी
तुजलागी रे करीन 
निर्मळ करून मन
देवा नैवेद्य अर्पिन ॥२

अहं मम सरो माझे 
फक्त तुझेपण राहो 
सर्वस्वाची राख माझ्या
तुझी रे विभूती होवो ॥३

मांडीयेला कल्लोळ मी  
देवा तुझ्या दारावरी 
धाव धाव दयाघना 
पाव मज आता तरी ॥४
 
नको मज मोठेपण
देई खुळे भक्त मन
तुझ्या पदी विसावून 
जग जावे हरवून ॥५

 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

ज्ञानदेवी माय

 

ज्ञानदेवी माय

***********

तुज पांडुरंगा मा

गावे ते काय 

ज्ञानदेवी माय 

दिलीस तू  ॥


यया सुखा पुढे 

अवघे थोकडे 

याहून चोखडे 

जगी नाही ॥


माय सांभाळते  

माय दटावते 

माय जोजावते 

जीवनात ॥


जरी मी उनाड 

अभ्यासा वाचून  

खेळून मळून 

घरा येई ॥


 न्हावून माखून 

भक्तीच्या शब्दांत 

ज्ञानाचे अमृत 

पाजवते  ॥


विक्रांत नाठाळ 

खेळतो शब्दांत 

अर्थ तो पोटात 

उतरे ना ॥


परी भरविता 

थकत  ती नाही  

पुन्हा देतं राही 

मुखी घास  ॥


**********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

कापुराची माया

कापुराची माया
************
कापुराची माया 
आगीला कळावी
समरस व्हावी
मिठी मग ॥

तैसी घडो भेटी 
देवा तुझी माझी
हौस नसण्याची 
पुरवावी ॥

मिठाची बाहुली 
भेटावी सागरा 
भेदाचा पसारा 
नुरुनिया ॥

तैसे घडो काही 
जिवलगा नेई
आणुनिया पाही
 प्राण डोळा ॥

सरो देह भाव
जळो मन राव 
निरंजनी ठाव 
देई मज ॥

विक्रांत दत्ताचा 
दास हा जन्माचा 
तयाचा प्रेमाचा 
ध्यास धरी ॥
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...