माऊली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माऊली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ जून, २०२५

आळंदीत

आळंदीत
*******
माझ्या आळंदीचा थाट किती वर्णावा शब्दात 
उभे आडवे चैतन्य लोटे सोनेरी लाटात ॥

उभे पदोपदी नम्र दूत वैकुंठ धामीचे 
घेती एकेक वेचून सल भक्तांच्या मनीचे ॥

दृष्य अदृष्य कृपाळ संत मांदियाळी थोर 
तया दृष्टीत वाहतो प्रेम कृपेचा सागर ॥

नाम मोत्यांचे भांडार नच सरते अपार 
शत पिढ्या जोडोनिया घ्यावे इतुके भांगार ॥

माय धन्य धन्य झालो तुझ्या नगरीत आलो 
वारी तुझिया दारीची सुख सुखाचे पातलो ॥

शब्द ज्ञानेश्वर फक्त माझ्या मनात उरावा 
जन्म प्रकाशाचा खांब देहासहित या व्हावा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

रविवार, १ जून, २०२५

ज्ञानदेव म्हणता

ज्ञानदेव म्हणता
************

मुखे ज्ञानदेव म्हणता म्हणता
 मन झाली वार्ता नसण्याची ॥१

हरवला ध्वनी कैवल्य स्पंदन 
आनंद कंपण उरलेले ॥२

काळवेळ कुणी मारले गाठीला 
अस्तित्व चोरीला गेले काय ॥३

पण भय चिंता नव्हती किंचित 
स्वयंप्रकाशात आत्मतत्व ॥४

विक्रांत सरला स्वर शब्द भाव 
दशा ज्ञानदेव येणे नाव ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

माय

माऊली
*******
चालव माऊली तुझ्या वाटेवर 
जन्म पायावर उभा कर 

रांगलो बहुत घेऊनी आधार 
इथे आजवर काल्पनिक 

भयभीत जिणे चाललो चाकोरी 
दृढ व्यवहारी चिटकून 

कळू कळू येते माझे वेडेपण
झापड लावून चालणे ते 

कानी येते काही मंद तुझी साद
स्वप्न हृदयात उसळते 

पाहू नको अंत तुझ्या लेकराचा 
आक्रोश जीवाचा शांत करी 

करी तडातोडी पायीची ही बेडी 
येवुन तातडी कृपा कर 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...