ज्ञानेश्र्वर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज्ञानेश्र्वर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

लायकीचा

कर लायकीचा
**********

कृपेविना ग्रंथ तुझा 
कळणार कुणा देवा 
अधिकाराविना काय 
कधी प्राप्त होतो ठेवा 

या शब्दांशी खेळतांना 
अर्थापाशी थांबतांना 
भावभावी गुंततांना 
घडे काही बोलवेना

शब्दातून तूच जणू  
उतरशी हळू मना
ज्ञाताच्या पल्याड काही 
देसी उघडूनी क्षणा

मोती मोती वेचतांना 
जन्म वाटे किती उणा 
म्हणूनिया तुझ्या पायी 
वाटे यावे पुन:पुन्हा 

सोडूनिया यत्न सारे 
उभा रिक्त ओंजळीचा 
विक्रांता या दयाघना 
कर तुझ्या लायकीचा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

चैतन्य डोह

चैतन्याच्या डोही
*************
तुझ्या चैतन्याच्या डोही हरवलो 
भरून पावलो ज्ञानदेवा ॥१

जैसे माहेराशी येता अवसरी 
माया न आवरी माऊलीची ॥२

काय अन किती देऊ लेकराला 
तैसे या जीवाला जोजारले ॥३

माय केले नाही फार येणे जाणे 
फक्त तुझे गाणे आळविले ॥४

अंतरीची तार जडली तुझ्याशी 
भेटला मजशी कृपा राशी ॥५

राहू दे प्रेमात तुझ्या रात्रंदिन
एवढे मागणं तुज लागी ॥६

रहा हृदयात डोळ्यांच्या डोळ्यात 
विक्रांत तुझ्यात घे सामावून ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

इंद्रायणी

इंद्रायणी प्रवाह
***********

ओंजळीत इंद्रायणी भरलेले काळे पाणी 
 पलीकडे पारावर जात होती धुतली धुणी

अलीकडे घाटावर न्हाते कोणी साबणानी
 किती अवहेलना ही डोळीयात आले पाणी 

धर्म पाणियाचा माई नेत होती निभावूनी 
धर्म पाळत होते कोणी फेकूनिया तीत नाणी
 
कोणासही काही काही वाटत नव्हते मनी
तीरावर बाजारात दानधर्मी मग्न कुणी

आठवली माई रूपे ती पापताप नाशनी 
गंगा यमुना नर्मदा पण तीच ती कहाणी 

सरू दे गं अज्ञान हे धर्म येऊ दे कळूनी
एक एक तरंगात जगा दिसू दे चांदणी

इतकेच मागणे मी घेत होतो तिज मागूनी
आणि वळताच मागे कोणी हसे खळाळूनी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

महातेजा

महातेजा
********
माझ्या जीवलगा प्रिय ज्ञानराया 
येऊ दे रे दया तुज माझी ॥१
देई गा भरून फाटकी ही झोळी
प्रकाशाचा भाळी टिळा लावी ॥२
करी कळवळा येई गा अंतरा 
चैतन्य दातारा पूर्ण करी ॥३
जगलो जगणे काळाच्या वाहणी
रितेपणी मनी खंतावलो ॥४
नाम ध्यान जीवी बहुत ठेविले 
परि ना भरले पात्र माझे ॥५
सरले गा यत्न देहाचे मनाचे 
कैसे कैवल्याचे दान पावू ॥६
तुझिया वाचून कुठले चरण 
धरेना हे मन  काही केल्या ॥७
गुरु तूच माझा सद्गुरु जीवाचा 
तुझिया प्रीतीचा लोभ जीवी ॥८
आता महातेजा करी उणे पुरे 
जवळी घे रे लेकरा या ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

आळंदीत २

आळंदी २
********
जाहले दर्शन ज्ञानदेव भेट 
पाझर डोळ्यात भरू आला ॥

जडावली वाचा उगा झाले मन 
ओझे मण मण पाऊलात ॥

दर्शनाच्या ओघी पिंडीवर धार 
तैसा क्षणभर विसावलो ॥

विझल्या वाचून मनाची तहान 
आलो बारीतून बाहेर ही ॥

आला परि देह पंच महाभुते 
मिठी नच सुटे अंतरीची ॥

कोटी कोटी स्पर्श तिथे विसावले 
मजला भेटले कडाडून ॥

स्पर्शांच्या सांगाती संताना भेटलो
अगा मी पातलो महासुख ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...