महातेजा
********
माझ्या जीवलगा प्रिय ज्ञानराया येऊ दे रे दया तुज माझी ॥१
देई गा भरून फाटकी ही झोळी
प्रकाशाचा भाळी टिळा लावी ॥२
करी कळवळा येई गा अंतरा
चैतन्य दातारा पूर्ण करी ॥३
जगलो जगणे काळाच्या वाहणी
रितेपणी मनी खंतावलो ॥४
नाम ध्यान जीवी बहुत ठेविले
परि ना भरले पात्र माझे ॥५
सरले गा यत्न देहाचे मनाचे
कैसे कैवल्याचे दान पावू ॥६
तुझिया वाचून कुठले चरण
धरेना हे मन काही केल्या ॥७
गुरु तूच माझा सद्गुरु जीवाचा
तुझिया प्रीतीचा लोभ जीवी ॥८
आता महातेजा करी उणे पुरे
जवळी घे रे लेकरा या ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️