वारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ जुलै, २०२५

पदस्पर्श

पदस्पर्श
*******
तुझ्या पायावरी ठेवीला मी माथा 
अजूनही खरे न वाटते या चित्ता

रुजुनिया स्पर्श हुळहुळे भाल
 स्तब्ध झाले मन यंत्रवत चाल 

अगा त्या पदात स्पर्श ज्ञानदेव 
 तुकाराम एकनाथ नामदेव 

आणिक कित्येक संत भागवत 
अनंत भाविक कोटी कोटी भक्त

जुळलो तयांशी एकतान होत
सुख दाटूनिया आले अंतरात

साऱ्या पंढरीत झालो भाग्यवंत
 लोटली रे युगे एका त्या क्षणात

विक्रांत कृतार्थ भेटली पावुले 
पंढरीचे सुख मज कळू आले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १६ जुलै, २०२५

वारी

वारी
*****
येताच आषाढी निघाले भाविक 
बांधून पडशी जग हे मायीक ॥१
लोट लोटावरी धावती प्रेमाचे 
जणू अनिवार जल उधाणाचे ॥२
तयांची ती चिंता अवघी देवाला
सांभाळी चालवी धरून हाताला ॥३
चालतो कुणी घेऊन शिदोरी 
कुणी तो दुसरा मागतो भाकरी ॥४
वाहतो पाण्यात थोडासा कचरा 
पण निर्मळता नच सुटे जरा ॥५
धन्य पायपीट चालते सुखात 
देवाच्या कृपेची खूण पाऊलात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ९ जुलै, २०२४

पालखी

पालखी
******
पालखी हालते  पालखी डोलते
भजन चालते विठोबाचे ॥१

राम कृष्ण हरी घोष निनादतो 
टाळ दणाणतो भाविकांचा ॥२

ज्ञानोबा तुकोबा मृदुंग बोलतो 
हात कडाडतो वैष्णवांचा ॥३

पाऊल पडते रिंगण चालते 
चित्त हरपते नाद लयी ॥४

पालखीत माय कौतुके पाहते
प्रेम उधळते मायातीत ॥५

पाहता काळीज प्रेमे धडाडते 
डोळ्यात लोटते महासुख ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २३ जून, २०२२

पालखी

पालखी
*******

थरारे कळस 
कळ हृदयास 
देवा तुझा ध्यास 
अंतरात ॥१

सरेना विरह
मिटेना काहुर
डोळियात पूर
आसवांचा॥२

धावते पालखी 
वेडेपिसे जीव 
अंतरात भाव 
साथ तुझी ॥३

आणिक जीवना 
हवे असे काय 
चालो सवे पाय 
देवा तुझ्या .॥४

फाटक्या देहाची 
विदीर्ण ही खोळ 
तुझ्या पथावर 
पडो देवा ॥५

विक्रांता जीवन 
दोन पावुलांचे 
आळंदी नाथाचे 
राहो ऋणी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...