वीणेकरी
*******
अपार भरल्या गर्दीत राउळी उभा वीणेकरी नाद लयी ॥
कुणी पायावरी ठेवीतसे माथा
कुणी काढे वाटा बाजूने तो ॥
त्यास मोजमाप नव्हते कुणाचे
नाव विठोबाचे मुखी फक्त ॥
मज गमे चित्त तेच विणेकरी
विचारी विकारी गर्दीतले ॥
तैसा तया ठायी देता मी तो नाद
सरले संवाद विसंवादी ॥
झंकारली वीणा लयी गेले मन
गर्दीत संपूर्ण निरंजन ॥
विचारी राहून विचारा वाचून
उगवून मौन शांत झालो ॥
कृपा ज्ञानदेवी भरून राहिली
विक्रांत हरली सुधबुध ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा