निजज्ञान
********
घोकून मंत्र वेदामधले काय कुणी तो होतो संत रेटून पंथ जाहिरातीत काय कुणी तो होतो महंत
अगा हे तर यंत्र चालते मेंदू दुसरे काय असते
मंद कधी जे रे कुणाचे तर कुणाचे तीक्ष्ण असते
कुणी शिकवतो गुप्तविद्या घेऊनिया ते धन
आणि निराश परमार्थी जातो विश्वास हरवून
कुणी चालतो रानी वनी त्या घरदार सोडूनी
कुणी होतो जन्म बंदी संस्थेत कुण्या अडकूनी
इतुके कसे असते अवघड घडणे रे निजज्ञान
जन्म हरवतो काठावरती नच घडते ते स्नान
दिशा हरवती वाटा मोडती सापडते ना दार
तिमीरातल्या या सुखाला मग सरावतो संसार
जया जे हवे तेच मिळते आणि जीवन फळते
या उक्तीतील खोच मग हळूच मजला कळते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा