ज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

निजज्ञान

निजज्ञान
********
घोकून मंत्र वेदामधले काय कुणी तो होतो संत 
रेटून पंथ जाहिरातीत काय कुणी तो होतो महंत 

अगा हे तर यंत्र चालते मेंदू दुसरे काय असते 
मंद कधी जे रे कुणाचे तर कुणाचे तीक्ष्ण असते

कुणी शिकवतो गुप्तविद्या घेऊनिया ते धन 
आणि निराश परमार्थी जातो विश्वास हरवून

कुणी चालतो रानी वनी त्या घरदार सोडूनी
कुणी होतो जन्म बंदी संस्थेत कुण्या अडकूनी 
 
इतुके कसे असते अवघड घडणे रे निजज्ञान
जन्म हरवतो काठावरती नच घडते ते स्नान

दिशा हरवती वाटा मोडती सापडते ना दार 
तिमीरातल्या या सुखाला मग सरावतो संसार 

जया जे हवे तेच मिळते आणि जीवन फळते 
या उक्तीतील खोच मग हळूच मजला कळते 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



बुधवार, २९ जानेवारी, २०२०

ज्ञानीयाच्या गाठी

 

ज्ञानियाच्या गाठी 
************

ज्ञानियाच्या गाठी 
ज्ञानाच्याच गोष्टी 
भाकरीची पोटी 
याद नाही

येई जिवलगा
घेऊनिया हाती 
अमृताची वाटी 
काठोकाठ 

काय सांगू बाई 
शब्द कवतुक 
ओघळते सुख 
श्रवणात

बोलता बोलता 
जीवीचे ते गुज
सांगती सहज 
बहुमोल 



अदृष्य ते दृष्य
दिसू लागे डोळा 
भेटीचा सोहळा 
मनोरम

चैतन्याची कळा
चैतन्यात गोळा 
चैतन्य निराळा 
तरी भासे

जाहला सत्संग 
सत्याचाच संग
विक्रांत निसंग 
क्षणा भेटी


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

वेगळा




वेगळा 
*****

सुटला संदेह
काय माझा देह
राहतो ते गेह
कुणाचे ते

सुटला हा खेळ
अवघा गोंधळ
ज्यात ताळमेळ
मुळी नाही

जन्मा आले तन
लिहिलेले मन
वाहणारा प्राण
अव्याहत

माझे तुझे त्यांचे
एकाच साच्याचे
सुखाचे दुःखाचे
मोजमाप 

विक्रांत वेगळा 
रुप नाव त्याला 
आणिक जयाला 
कळे तो ही 

दत्ता कळू दिले 
स्वप्न उगा आले 
मी पणे पडले 
जाणिवेला 

****
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...