निळा
****
तुम्ही स्वीकारलेला निळा रंग
खरेच दूरस्थ नाही मला
तो रंग आकाशाचा
कुठलेही बंधन नसलेला
तेजस्वी सुखद ऊर्जा भरलेला
तो रंग आहे माझाही
माझ्यात खोलवर रुजलेला
हृदयात मुरलेला
चिदाकाशात पसरलेला
गर्द निळूला
अन् त्याच वेळी
मी धन्यवाद देतो तुम्हाला
की तुम्ही नाही स्वीकारला
तुंबलेल्या शेवाळाचा हिरवा रंग
अन्यथा या पुण्यभूमीत
हाहाकार असता माजला
तसे तर तुमच्या कुठल्याही निर्णयाची
चिकित्सा करण्याची
लायकी नाही माझी
तुम्ही हिमालय
मी गावची टेकडी ही नाही
कधी कधी मला वाटते
तुम्ही स्थापन केला आहे
एक नवा धर्म
कुठलाही विधी विधान नसलेला
कर्मकांड नसलेला
कुठलेही replacement नसलेला
केवळ माणसाला मानणारा
ज्ञान तेजात चमकणारा
जो डोकावतो तुमच्या संविधानात
तुमच्या भाषणात पुस्तकात
खरेच कुठल्याही प्रेषिता पेक्षा तुम्ही
कणभरही कमी नव्हता .
आजच्या या स्मृती दिनी अन्
तुमच्या प्रत्येक स्मृती दिनी
माझ्या सर्व संस्काराचे
आवरण बाजूला ठेवून
मी वंदन करतो तुम्हाला
पुन्हा पुन्हा
अन् एक प्रार्थना उमटते मनातून
त्या नील रंगाचा अर्थ कळू दे सर्वांना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा