मागणे
****
घडू दे शेवट आता प्रवासाचा दिस अखेरचा गोड करी ॥१
नाही बुद्धिमान नाही धनवान
जगलो लहान सामान्यसा ॥२
नाही कीर्तीवंत नाही यशोवंत
परी अंगणात तुझ्या झालो ॥३
पावलो ती सुखे लागती जीवना
भोगले दुःखांना सवे काही ॥४
जैसी जन चार जगती जीवनी
भिन्न रे त्याहूनी नच नाही ॥५
उतलो मातलो नाहीच वाहणी
अवघी करणी देवा तुझी ॥६
देवा सुखरूप आणले जगात
नेई रे परत तैसाची तू ॥७
परी नेण्याआधी एकच विनंती
देवा देई भेटी एक वेळ ॥८
पाहता पाहता तुझिया रूपाला
मिटू दे हा डोळा अखेरचा ll९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा