बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

सावळी राधा


सावळी राधा
**********

पाहणे ते तुझे शब्दाविण गाणे 
लाख लाख तारे उरी कोसळणे
हसणे ते तुझे वासंतिक वारे 
तार काळजाची झणाणे थरारे 
दिसणे असे की आषाढ दाटला
मल्हार सावळा गात्री थरारला
रुसणे जणू की हिम गोठलेला 
अंतरात उष्ण बाहेर थिजला 
टाळले तुजला किती ठरवून
उमलते कळी येता तू दिसून
भाळलो कसा मी मला न कळून
हरवलो जळी जळचि होवून
जाणतो जरी हे असे व्यर्थ  खुळ 
क्षण सवे तुझ्या सुखची केवळ 
असू दे अंतरी चित्र सावळे ते 
सावळ्या राधेस कृष्ण तो कळू दे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...