शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

आसावरी ताईच्या कवितेचे रस ग्रहन

*मावळत्या दर क्षणात*  (रसग्रहन)
****

मावळत्या दर क्षणात
उगवतसे बिंब नवे
पण दिव्यास मालवत्या
स्नेहाचे तेल हवे

देहस्वी ऐहिकास
नवनवीन श्वास हवा
घरभिंती सजवाया
जगण्याचा कैफ हवा

भोवळले जग सगळे
भीतीने गारठले
अन तशात एक मोर
पावसात नाचतसे

विस्कटते स्वप्न एक
तोच दुजे अवतरते
सळसळती उंच लाट
वेगाने ओसरते 

आवर्तन हे असेच
चाललेय नेमाने
या विराट योजनेस 
अर्पावे हे 'असणे'..!
***
आसावरी काकडे
३०.४.२०२१

मनात खोलवर रुजलेली नश्वरते ची जाणीव आणि त्या जाणीवेवर विवेकाने, प्रज्ञेने, अभ्यासाने  व चिंतनाने केलेली मात असे या कवितेचे स्वरूप मला जाणवते.
काळ हे मापक तसे सापेक्ष असते. सूर्य बिंब मावळत असते म्हणजे क्षणाक्षणाने सूर्य ही विझत असतो तरी दुसरीकडे आपल्याला तो नवा दिसत असतो. 
अन आपल्या दृष्टीने सूर्याचा काळ प्रचंड मोठा हजारो वर्षाचा असल्यामुळे  आपण तो अमरत्वामध्ये मोडू शकतो पण दिवा जो आहे तो आपल्यासमोर पेटत असतो आणि विझत असतो खरंतर सूर्याचे आणि ज्योतीचे पेटणे आणि विझणे या दोन्हीही गोष्टी जरी एकच असले तरी आपल्या काळ परिमाणात जी गोष्ट आपल्या हातात असते ती आपण  सकारात्मक रित्या करून  तिचा आनंद घ्यावा.म्हणजे दिव्याला तेल घालणे.

आपले ऐहीक जीवन हे देह आश्रित आहे आणि या  जीवनात अर्थ, मजा,उत्साह मिळत असतो तो नवनव्या गोष्टींमुळे . नाविन्यातच खरे जगणे असते. याशिवाय त्या जगण्यात आपण आपला कैफ ,धुंदी आसक्ती आवड उतरावी लागते छंद जोपासावे लागतात. तरच ते जगणं सुंदर होते

कवयित्री म्हणतात की भोवताचे जग जरी  गारठलेले घाबरलेले दु:खामध्ये व्यथेमध्ये अडकलेले आहे.तरी तिथे पावुस आहे अन त्यात एक मोर नाचत आहे आणि हा मोर म्हणजे मानवी मनातील आनंदाचे ,जीवन इच्छेचे प्रतीक आहे

पाण्याची एक लाट उंच उसळते आणि दुसऱ्या क्षणी ती पुन्हा खाली उतरते मानवी मनामध्ये स्वप्नांची मालिका चालू असते. मन एक स्वप्न पाहते व ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा करते कधी कधी ते स्वप्न पूर्ण होते कधी नाही.आणि मग ते संपूर्णपणे एका उंचीवरून ते नाहीसेही होते. आणि मनात पुन्हा एकदा दुसरे स्वप्न उगवते ही मालिका सदैव चालू असते प्रत्येक मनात चालू असते

एकदा का हे जीवनाचे तथ्य मनाने स्वीकारले आणि त्या तथ्यानुसार जीवन  जगण्याला सामोरे गेले म्हणजे त्या जगण्यातील नैराश्यता निघून जाते आणि जीवनाच्या सुरात सूर मिसळून आनंदाने जगणे होते 

आपण असण्याच्या अगोदरही हे जीवन हजारो वर्षापासून चालू होते आणि आपण गेल्यावर सुद्धा हजारो वर्ष जीवन चालू राहील कदाचित त्याच्यामध्ये मानव प्राणी नसेल ही पण जीवन चालू राहील . तर अशा या अनंत जीवनातील, आपण एक क्षणभरचे कणभर अस्तित्व आहोत ,हे आपल्या अस्तित्वाचे असणे विना क्लेश स्वीकारणे, यासाठी मोठी समज असावी लागते .
अन या समजे मध्येच प्रज्ञेचा  उदय असतो.
तो इथे न लिहताही अधोरेखीत होतो.

विक्रांत तिकोणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरसा

आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो  कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो  मी तुला खुश करतो क...