मैत्री
****
दुरावणे मैत्रीचा अंत नसतोच कधी हरवणे मैत्रीचा धर्म नसतोच कधी ॥
पार्टी एक निमित्त असते भेटण्याला
पार्टीविना अर्थ नसे काय कधी मैत्रीला ॥
सेंड ऑफ मुळीच माहीत नसतात मैत्रीला
येतीजाती निरोप असे ठावुक असते मैत्रीला ॥
गाठीभेटीविना वर्ष कधी महिने जातात
स्वल्पविरामा त्या कधी कुणी का घाबरतात ॥
जिथे थांबते तिथूनच कॅसेट पुढे सुरू होते
मैत्रीचंही त्याहून वेगळे असे काहीच नसते ॥
एकदा सजली कि खरी मैत्री अमरवेल होते
आणि फळाफुलावाचून फक्त स्नेहावर जगते ॥
अन् स्नेह संपला तरच मैत्रीचा अंत होतो
तोवर तो एक चिरकालीन धुंद वसंत असतो ॥
आदरयुक्त मैत्री कधी भक्तीयुक्त मैत्री असते
प्रीतीयुक्त मैत्री कधी खोल कधी उथळ वाटते ॥
पण मैत्रीचे सारेच रंग तरल तलम असतात
अनुबंध हेच रे जीवनाचे खरे तरंग असतात ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️