ती गेली
*****
चार तापाची साथ ही
सुटली
क्षणात सुटली
सौख्य सारी
आताच भेटली गमते
मजला
आताच फुलला
होता ऋतु
तव गजर्याचा गंध अजून तो
बघ दरवळतो
कणोकणी
तीच सळसळ तव
पदरांची
गृह चैतन्याची
साक्ष असे
आणि किणकिण देही
भरली
चुड्या मधली
रुंजी घालते
येईल हाक अहो
म्हणूनी
अवचित कानी
सदा वाटते
कुठे न गेलीस
कधी न सांगता
मग हे आता
घडे कसे
सोबत सदैव हवी
तुला ना
मग सांगना
काय झाले
गेलीस ते ही तू
खरे ना वाटते
स्मरतो जरी ते
भ्रम वाटे
तुझ्या वाचून
इथले जगणे
उगाच वाहने
देह जणू
हातात हात तुझा राहावा
सवेची यावा
जन्म पुन्हा
ऋणानुबंध हे कधी
न मिटावे
सदैव पहावे
मी तुजला
एकच सखये हे
होते मागणे
तुजला घडणे
जाणे असे
तुझ्याविना मज कसले राहणे
जुनेच दुखणे
तू ते जाणे
जुनेच दुखणे
तू ते जाणे
थांब जरासी त्या
दारावरती
पावुल काढती
घेतो मी ही
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा