शनिवार, २९ जून, २०१९

डॉ.शोभा चव्हाण मॅडम




मजबूत तटबंदी असलेली
खंबीरपणे उभी राहिलेली
गढी तुम्ही पाहिली असेल
चव्हाण मॅडमला पाहिले की
मला ती गढी आठवते.

त्यांचे व्यक्तिमत्त्व असेच आहे 
खंबीर रोखठोक आणि दृढपणे
उभे असलेले स्वत्व जपलेले
तिथे भुसभुशीतपणा मुळीच नाही
तिथे आहेत
कणखर निष्ठेची तत्त्वाची
दगडी चिरेबंदी
ठामपणे उभी असलेली
तिथे तुम्हाला उगाचच्या उगाच
प्रवेश मिळणार नाही
तिथे तुमचे काम असेल
तुम्हाला गरज असेल
तुम्ही प्रामाणिक कष्टाळू
कर्तव्यनिष्ठ असाल
तर गढीचे दरवाजे तुमच्यासाठी
सदैव उघडे असतील.

खरच चव्हाण मॅडमला
आळशी कामचोर
आणि उद्धट माणसांबद्दल
प्रचंड चीड व नावड आहे
त्या अत्यंत स्पष्टवक्त्या आहेत
आणि समोरच्याची चूक
त्यांच्या तोंडावर बोलून दाखवण्यात
मुळीच कचरत नाहीत
त्यामुळे येणा-या नाराजीची
त्यांना काहीच पर्वा नसते
आपण डॉक्टर असल्याचा
आणि आपल्या पदाचा
सार्थ अभिमान त्यांना आहे
त्यामुळे कुणी येऊन केलेला अपमान
त्या सहन करू शकत नाहीत .
जरी बऱ्याच वेळा व्यर्थ बोलणा-या कडे
त्या सहज कानाडोळा करतात
पण वेळ येताच त्याची
कान उघडणी करण्यास
मुळीच मागेपुढे पाहत नाहीत.

त्यांच्या जगात तुम्हाला
सहजासहजी प्रवेश मिळत नाही
पण मिळाला कि कळेल
त्या प्रचंड साध्या प्रेमळ उदार आहेत .
मित्र मैत्रिणींना लेकी बाळींना
एवढेच नव्हे तर शेजारी पाजारी
यांनाही खाऊ पिऊ घालण्यात
त्यांना खूप आनंद मिळतो.
त्यांच्या वागण्यात बोलण्यात
कधी राजकारण नसते
पण आपल्या बॉसला
सगळेच सांगितले पाहिजे
असे त्यांना वाटते
त्यामुळे काही लोकांना
त्यांच्यात चाणक्य किंवा नाना फडणीस
यांचे रूप दिसत असेल तर
नाईलाज हे.

तसेच त्यांना नाही जमत
उगाच सगळयाबरोबर 
गुडी गुडी राहणे .
कारण ते त्यांच्या स्वभावातच नाही .
आपण रुग्णालयाचे अॅडमिन आहोत
अन् जे करतो ते
रुग्णालयाच्या भल्यासाठीच करतो
याचे सदैव भान असते .

कुठलेही काम हाती घेतले कि
ते तडीस नेणे ,शेवटापर्यंत पोचवणे
हा त्यांचा खास गुणधर्मच आहे .
जे आपल्या वाट्याला आले
ते सारे सहजतेने त्यांनी स्वीकारले .
जीवनाला सामोरे जात
सारे सुखदुःख  पचवले .

मला माहित आहे ,
आपल्यापैकी फार कमी लोकांना
चव्हाण मॅडम कळल्या असतील .
बरेच लोक त्यांच्याकडे यायला
कचरत असत, घाबरत असत .
पण त्यांची तत्त्वनिष्ठा कळली की
त्यांना समजणे सोपे आहे
आपल्या कामाशी प्रामाणिक रहा
कार्यमग्न रहा कर्तव्यतत्पर रहा
हेच त्यांचे सांगणे असे
तसे न केले तर
अॅडमिनला अडचणीत आणले तर
त्यांना खपत नसे
मग नियमाप्रमाणे
वरिष्ठांकडे तुमची तक्रार होणार
तुम्हाला मेमो मिळणार
हे निश्चित
पण त्यात त्यांचे व्यक्तिगत राग लोभ
असे काही नसायचे .

इतकी वर्षे रुग्णालयाच्या ऑफिसचा
अविभाज्य भाग असलेल्या
चव्हाण मॅडम आज आपला निरोप घेताहेत
त्यांना दीर्घायू लाभो
आरोग्य लाभो
सुखसमाधान लाभो
हीच प्रार्थना  .

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
(कवितेसाठी कविता )


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...