माझ्या मनी पालवला
दत्त सुखाचा वसंत
गेल्या भरूनिया दिशा
अवघा आनंदी आनंद॥
चैत्र पालवी सुरेख
गंध सुमनांचा मळा
स्वर नामाचा विलसे
फुले कोकिळेचा गळा ॥
वारा उत्तरेचा मंद
येई सांजेला घेऊन
गंध चंदनाचा काही
नेई राउळी ओढून ॥
देही उत्सव नटूनी
मनी ऋतुराज येई
धुंद मोहर जाणिवी
सुख उघडून जाई॥
भाग्य आले माझ्या दारी
तन मनाचे तोरण
होई विक्रांत हिंदोळा
सुखा थिटे त्रिभुवन ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा