श्रद्धांजली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रद्धांजली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ जून, २०२५

मारुती चितमपल्ली सर


मारुती चितमपल्ली सर 
*******************
ते जंगलातील 
समृद्ध आणि विलक्षण जग 
दाखवले तुम्ही आम्हाला 
या शहरातील 
खुराड्यातील मनाला 
जणू दिलेत 
एक स्वप्न जगायला 

रानातून उपटून आणलेले रोप
जगतेच कुंडीत 
ते रानातील सुख 
सदैव मनी आठवीत 
त्या कुंडीतील रोपास 
सांगितल्या तुम्ही  गोष्टी 
रानाच्या सौंदर्याच्या 
ऋतूच्या मैफिलीच्या 
आकाशाच्या चांदण्याच्या 
पावसाच्या पक्षांच्या 
आणि त्या गूढ रम्य कथाही 
मितीच्या बाहेरच्या 

जंगलात न जाणारे किंवा 
क्वचित जंगल पाहणारे आम्ही 
ते जंगल पाहतो जगतो मनी 
या मनोमय कोषात 
तुमच्या लिखाणातून 
तुमच्या गोष्टीतून 

आमच्या आदिम पेशीत दडलेले ते रान 
तुम्ही जागे ठेवले जगवले 
कृतज्ञ आहोत आम्ही तुमचे 
ती कृतज्ञता शब्दाच्या पलीकडची आहे 
शब्दात मांडता येत नाही 
तरीही या कुंडीतील रान रोपाची 
कृतज्ञ शब्द फुले 
तुम्हाला समर्पित करतो.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

सोमवार, १० मार्च, २०२५

डॉ उषा म्होप्रेकर मॅडम (श्रद्धांजली )



डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस  (श्रद्धांजली )
************************
चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता  
धारण केलेले व्यक्तिमत्व होते 
म्होप्रेकर मॅडमचे 
ती शीतलता प्रियजनावर ओसंडणारी 
अविरत निरपेक्ष आणि भरभरून 
जी अनुभवली आहे आम्ही सर्वांनी
आणि ती तप्तता जी नव्हती कधीच 
जाळणारी पोळणारी छळणारी 
परंतु होती सुवर्णतप्त 
कर्तव्यनिष्ठतेच्या पदाच्या अधिकाराच्या सन्मानातून आलेली

प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून 
एम टी  अगरवाल हॉस्पिटलमध्ये 
त्यांनी केलेले काम 
होते अतिशय प्रामाणिक 
स्वच्छ आणि पारदर्शक  
कोणाच्या एका रुपयाचे मिंधेपण नसलेले
स्वच्छ निष्कलंक जीवनाचा त्या आदर्श होत्या 

प्रमुख वैद्यकीय अधिकारी या पदाचा 
त्रास त्यांनी तेवढ्याच सामर्थपणे पेलला 
जेवढा त्या पदाचा आनंद त्यांनी घेतला
मित्र आप्तेष्टा सोबत अतिशय मनमोकळेपणा
 प्रामाणिक लोकांबद्दल प्रचंड आस्था 
 ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती

काही लोक त्यांना खरोखर
मनापासून आवडायचे नाहीत 
परंतु त्यांना दूर ठेवूनही 
त्यांच्याबद्दल कुठलीही सूड बुद्धी आकस 
न ठेवता  वागल्या त्या.

एक अतिशय उदार मित्रप्रिय 
स्वाभिमानी करारी निष्कलंक 
निर्भय प्रामाणिक व्यक्तिमत्व 
आज आपल्याला सोडून गेले आहे . 
अशा व्यक्तींचे जाणें हे मित्रांसाठी 
आप्तांसाठी  फार मोठे नुकसान असते 
पण समाजासाठी एक हानी असते
या माझ्या प्रिय बॉसला आदरांजली .
परमेश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

रेखा चौधरी (pharmacist)श्रद्धांजली

रेखा चौधरी (pharmacist) श्रद्धांजली 
*****"
आज कळले रेखा चौधरी गेल्या.
धक्काच बसला मनाला .
२०-२१ ला म्हणजे आता आताच रिटायर झाल्या होत्या त्या .
दुसरी इनिंग सुरू झालेली नुकतीच .
त्यांची उंच शिडशिडीत 
 उत्साहाने भरलेली मूर्ती .
भावनांचे प्रकटीकरण 
ततक्षणी करणारा चेहरा.
चष्मा मागील वेध घेणारे डोळे 
विलक्षण नम्रता प्रामाणिकपणा 
कर्तव्यनिष्टता स्पष्टवक्तेपणा खरेपणा स्वाभिमानीपणा कष्टाळू वृती 
डोळ्यासमोर उभे राहतात 
नवीन शिकण्याची त्यांची इच्छा 
काहीही आत्मसात करण्याची वृत्ती 
एकूणच स्वतःचे शंभर टक्के झोकून देऊन 
काम करण्याची स्वभाव 
अतिशय गुणी व्यक्ती होत्या त्या 
आज आपल्यात नाही हे खरंच वाटत नाही 
काल कालच त्या रिटायर झाल्या
तरी तो टेबल त्या खुर्चीवर 
त्या कॉम्प्युटरच्या मागे बसलेली त्यांची मूर्ती 
काल पाहिलेल्या घटना सारखी ताजी आहे 
त्यांनी जीवनात पचवलेले दुःख क्वचितच ओठावर आणले 
आणि ओठावर आलं तेव्हा त्यांची सोशीकता पुन्हा पुन्हा मनावर ठसली
 मग ते लाडक्या मुलाची झालेली अचानक एक्झिस्ट असो 
वा कर्करोगाने केलेले आक्रमण असो
दुःख तर होते मनाला निराशाही येतेच 
पण ती पचवणे आणि उभे राहणे 
या दुर्लभ गुणांचे खंबीरतीचे दर्शन त्यांच्यात झाले 
त्यांनी कुठल्याही लढाईत कधीही माघार घेतली नाही 
पराभवाची चिंता केल्याशिवाय खंबीरपणे त्या उभ्या असत आपल्या भूमीवर ठामपणे 
आणि मानवी मनाची व जीवनाची जीत ही
जिजुविषेत असते.
अखेरच्या क्षणापर्यंत न मिटणारी 
ती  जिजूविषा त्यांच्यात होती हे निर्विवाद.
आमच्या मनात एमटीआगारवालच्या 
न मिटणाऱ्या आठवणी आणि व्यक्तीमध्ये त्या   कायम राहतील यात शंका नाही
ॐ शांती ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
कवितेसाठीकविता या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

उमेश परमार

उमेश परमार 
**********
परस्पर विरोधी गुणावगुणांनी 
भरलेले व्यक्तिमत्व असलेला उमेश परमार 
जीवना इतकाच मृत्यूलाही खेळ समजणारा 
सहजच पटात गेला मृत्यूच्या 
कबड्डी खेळणाऱ्या खेळाडू सारखा .
खरं तर अनेकदा त्याला 
स्पर्शून हसून हसून परत आलेला हा गडी 
या डावात मात्र, फसला कैचीत त्याच्या 
अन् परत आलाच नाही 

जीवनाच्या लाटावर स्वार झालेल्या
होडीगत तो जगत होता
हिंदकळत गरगर फिरत 
कुठे आपटत कोणावर आपटत 
कुणाला नदी पार नेत तर 
कोणाला मध्येच उतरवत 

त्याच्या आक्रमक आवाजामागे 
बेछूट देहबोलीमागे बेफिकीर वृत्तीमागे 
काय दडले असेल कोणालाच कळले नाही 
त्याचे प्रश्न आर्थिक होते का ?
सामाजिक होते का ?कौटुंबिक होते का ?
या चर्चेला आता काहीच अर्थ नाही 
कारण हे कोणीही सोडवायला गेले नाही 
आणि कुणाला सोडवता येणे नव्हते शक्यही 

मला मात्र आठवते ती रूग्णालयात 
त्याची परत येण्याची आर्जवी  विनंती 
आणि मी त्याला दिलेली संमती 
फक्त स्वत:ला बदल 
एवढी एकच अट ठेवलेली 
पण त्याचे बदलणे हे जणू 
अशक्य कोटीमधले होते 
हेही मला उमगत होते 

पण त्याने चीफ मेडिकल ऑफिसरच्या खुर्चीला 
देव मानले होते हे मला नक्कीच कळत होते 
त्याची ती श्रद्धा आणि आदर 
त्या बाहेरच्या वादळाचे अगदीच विरुद्ध रूप होते 

मला उमेश आठवता आठवता आठवू लागतात 
अनेक चेहरे उमेश सारखे 
माझ्या आजूबाजूला या रुग्णालयात वावरलेले 
आणि असेच अचानक निघून गेलेले 
जीवनाची तमा नसलेले 
भावनांच्या लाटेवर वाहणारे 
व्यसनात सुख शोधणारे 
सदैव अनुत्तरीत प्रश्न असलेले

आणि वाटते हे चेहरे या व्यक्ती 
 मूक हाका तर मारत नव्हते 
आपल्या सर्वांना आजूबाजूच्या सवंगड्यांना 
मानलेल्या मित्रांना सहकामगारांना 
त्याच्या त्या वर्तणुकीतून 
ज्या कधीच पडल्या नाहीत कानावर 
आम्हा कुणाच्याच?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

शीला पाटील सिस्टर ( श्रद्धांजली)

शीला पाटील सिस्टर ( श्रद्धांजली)
****************
तिला माहित नसेलही हे कदाचित 
सात्विकता होती ती जग पाजळीत ॥
यायची घेऊन सौम्य चांदणे सवेत
अन व्हायचे सारे जग प्रकाशित ॥
ती बोलायची मोजके जरी ना मित 
सभोवार उमटायचे  मंगल संगीत ॥
तिच्या हसण्याची एक मोहक रीत 
कानात गुंजायाचे शब्दा विना गीत ॥
फुले वेदनांची जरी की ओंजळीत 
नव्हतीच कटुता शब्द देह बोलीत ॥
ती शांत समयी जणू की देवघरात 
जरी रोष तडकून येई कधी वातीत ॥
ती आई शोधणारी प्रिय पाडसास 
तिचे डोळे तसेच करुणा हंबरीत ॥
ती गेली आता मागण्यास न्याय देवा 
संपली मेणमुर्त आज कोरली मेणात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...