व्यक्तिचित्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्तिचित्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

डॉ. मनीष दोशी Dy MS (I/C)राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)


डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)
*****************
खरे जे डॉ .मनीषला ओळखतात 
त्यांना सांगायची गरज नाही की
डॉ.मनीष, हे किती विलक्षण व्यक्तिमत्व आहे ते
खरेच ते एक वेगळेच रसायन आहे
पण या विशेष प्रसंगी 
आणि मैत्रीच्या प्रेमाखातर
मी थोडी  उजळणी करतो
  
जो एकदा मनीषला भेटतो
पाहतो बोलतो
त्याच्या मनाला डोळ्याला कानाला 
त्याचे वेगळेपण जाणवते राहते
त्याची एक छाप मनावर पडते .

ते व्यक्तिमत्व, 
जणू काही म्हणत असते
तुम्ही माझ्याशी मैत्री नक्कीच करू शकता !
हवेतर तुम्ही माझ्याशी वैरही करू शकता...
पण मला टाळू शकत नाही ;
माझ्यापासून पळू शकत नाही .

कदाचित मी तुम्हाला आवडू शकेल 
कदाचित न आवडू शकणार नाही
पण तुम्ही मला नाकारू शकत नाही.

कदाचित माझे म्हणणे तुम्हाला पटू शकेल 
अथवा पटू शकणारही नाही 
पण ते चूक आहे 
असे तुम्ही म्हणू शकणार नाही.

 या आगळ्यावेगळ्या,आणि 
दुर्मिळ व्यक्तिमत्वाच्या
तुम्ही जितके जवळ जाल 
तितके तुम्हाला कळून चुकेल की 
हा एक लखलखता हिरा आहे 

या हिऱ्याला आहेत असंख्य पैलू 
त्याला आपण जेवढे नीट निरखून पाहू
तसे ते गुण आपल्याला दिसू लागतात 

मनीषच्या सोबत राहू लागल्यावर 
त्याची मते  आणि विचार कळू लागल्यावर 
त्याचाशी चर्चा करू लागल्यावर 
कळले, की त्याने असंख्य गोष्टींचा 
अत्यंत तर्कशुद्ध, सूक्ष्म आणि प्रामाणिक 
अभ्यास केलेला आहे. 

डॉक्टर म्हणून 
मनीष बद्दल काय  बोलू,
तो माझा अत्यंत आवडता
 "डॉक्टर साथीदार "आहे
कॅज्युलटीत आणि ओपीडीत 
तो माझा पार्टनर असायचा.
 त्याचे सूक्ष्म निरीक्षण, अचूक निदान 
आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ,
हे गुण वादातीत आहेत.

कारण कुठलीही एमर्जन्सी 
हाताळायला लागणारे ; 
 updated वैद्यकीय ज्ञान  
त्याच्याकडे असायचे.
अन् तो कुठलीही 
emergency procedure 
सहज पणे करायचा 

त्यामुळे तो सोबत असेल तर 
कसलाही रुग्ण कुठलीही आणीबाणी 
आली तरी टेन्शन यायचे नाही

तो  कधी शब्दात बोलला नसेल 
पण रुग्णसेवा ही त्याच्यासाठी 
परमेश्वर सेवा होती 

एम.टीआगरवालच्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे 
ए मो आणि सीएमओ जोड्या 
वर्षानवर्षं  फिक्स असायच्या
माझ्या अगोदर मनीष चा पार्टनर 
डॉ शरद पिचड होता.
पण त्याचे प्रोमोशन  झाले 
व सुदैवाने मी मनीष सोबत गेलो.
(किंबहुना या एका आवडत्या मित्रांने 
 दुसरा आवडता मित्र  गाठून दिला. )
हे मैत्रीचे मोठे उपकारच आहेत.

तर अग्रवाल हॉस्पिटलमध्ये 
मनीष बहुतेक करून कॅजुल्टी नाईट करत असे
आणि मी एममो ड्युटी करत असे

या ड्युटीचा एक फायदा म्हणजे 
रात्री पेशंट कमी झाल्यावर
मनीषबरोबर खूप वेळ बोलायला मिळत असे 
आणि त्या चर्चा खुपच गहन 
आणि विचारांना चालना देणाऱ्या असायच्या
त्यातून एक विलक्षण समाधान मिळायचे
(कदाचित नंतर शांत झोप लागायला 
तेही एक कारण असेल)

आणि सहकारी म्हणून त्याचे 
किती कौतुक करावे 
तो मदतीला सदैव तत्पर असे
एखाद्या डॉक्टरने काम केले नाही
किंवा तो डॉक्टर ओपिडी तून उठून गेला 
नंतर आलाच नाही  
त्याची मनीषने कधीही तक्रार केली नाही
त्याने कधीही नावे  ठेवली नाही .
अन् कामात हातही आखडले नाहीत
खरतर इतरांपेक्षा  काकणभर अधिक काम 
तो करायचा .
रुग्णालय त्याच्यासाठी विस्तृत कुटुंब होते.

त्याचे मला जाणवलेले 
आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे
तो तो एक उत्तम सल्लागार आहे.
त्याचा सल्ला नेहमी तटस्थ नेमका 
आणि सर्व बाजूचा विचार करून दिलेला असायचा.
 
मनीष हे चतुरस्त्र ज्ञान असलेले
बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे 
त्याचे जनरल नॉलेज अफाट आहे 
हिंदू अन् जैन धर्माचा व्यासंग अफलातून आहे
तत्त्वज्ञान पुराण ,ध्यान आणि धारणा वर
त्याचा अभ्यास सूक्ष्म आहे  
खरच कौतुक केल्याशिवाय राहत नाही .
तो बोलू शकतो तुमच्याशी सविस्तर पणें 
रुग्णालयाच्या अडचणीवर
कामगारच्या प्रश्नावर
वरिष्ठाच्या मर्यादावर
एवढेच नव्हे तर
समाजकारण  अन राजकारणावरही

ज्याची मैत्री जीवनात वरदान आहे
असा तो मित्र आहे
असा गुणी मित्र असल्याबद्दल
 मला  स्वतःचा अभिमान आणि गर्व वाटतो
 
मनीष बद्दल आणखी एक बोलायचे म्हणजे 
त्याचे हस्ताक्षर खूपच सुंदर आहे 
त्याच्या लिहिण्यात कधी गिचमिड नसते
कुठेही  खडाखोड नसते .
अगदी तसेच त्याचे व्यक्तिमत्व आहे 
सरळ, सुंदर, टापटीप, शिस्तप्रिय आणि देखणे !

तसेच त्याचे चारित्र्य सुद्धा
निर्लेप निर्दोष सरळ 
नाकासमोर चालणारे आहे.
त्याच्याशी बोलताना जाणवते
तो एक अतिशय कुटुंब वत्सल माणूस आहे 
तो एक आदर्श मुलगा आहे 
आदर्श पती आहे 
आणि आदर्श पिताही आहे .

शेवटी आपलं कुटुंब हेच 
आपलं जीवन आणि जगणं असतं 
हे सूत्र त्याला परफेक्ट कळले आहे. 
त्यामुळे त्यांच्या सुखासाठी 
त्याने वेचलेले अपार कष्ट 
डोळ्यासमोर उभे राहतात 
आणि मनात कौतुक उमटते

जर देवाने माझ्यावर 
काही ठराविक मित्रच सोबत ठेवायची 
जाचक अट लादली तर
त्या मित्रांमध्ये मनीषचे स्थान 
खूप वरचे असेल यात शंकाच नाही 
मनीष सारखा मित्र लाभल्याबद्दल
मी परमेश्वराचे खरंच आभार मानतो 
आणि आज त्याच्या सेवापूर्ती दिनानिमित्त 
त्याला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो 
ही प्रार्थना करतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

 

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

शांताराम महाजन सिनीअर फार्मासिस्ट निवृत्ती दिना निमित्त .

शांताराम महाजन  सिनीअर फार्मासिस्ट 
निवृत्ती दिना निमित्त .
************
मुंबई महानगरपालिकेत 
काही भाग्यवान विभाग आणि कर्मचारी आहेत
त्यातीलच एक  विभाग म्हणजे 
फार्मसी डिपार्टमेंट आणि 
ते कर्मचारी म्हणजे औषध निर्माता .
रुग्णालय आणि दवाखाने 
फक्त डॉक्टर वर चालत नाहीत 
त्याला लागतात औषधे अन् इतर पुरक साधने
आणि ती हवी तेवढी हवी तेव्हा हवी तशी पुरवणे 
हे फार अवघड काम 
पण हा विभाग ते फार प्रामाणिकपणे करत आहे 

या परंपरेतील एक तसाच प्रामाणिक 
कष्टाळू दूरदर्शी काटेकोर पाईक 
म्हणजेच शांताराम महाजन 

शिवाजी महाराजांचे सारेच सेनापती धुरंधर होते 
त्याप्रमाणे रुग्णालयातील
सारे सिनिअर फार्मासिस्ट 
हे अतिशय कार्य कुशल होते  

महाजन एक व्यक्ती म्हणून ही 
मला तेवढेच भावतात ,आवडतात.
ते अतिशय नम्र सात्विक शांत आहेत 
जणू शांताराम हे नाव सार्थ करतात
त्यांचे वागणे बोलणे वावरणे म्हणजे 
एखाद्या नंदादीपासारखे असते 
समोरच्याला न दुखावणे 
जेवढी होईल तेवढी मदत करणे 
एवढेच नव्हे तर कधी कधी 
समोरच्याचे ओझेही खांद्यावर वाहणे
ते सहज करतात .
पण ती वेळ परिस्थिती गरज
ती तातडी निभावून नेतात 
औषधाचा निर्विघ्न पुरेसा आणि 
सततचा प्रवाह चालू ठेवतात
महाजन आणि त्यांचे सहकारी यांचे
हे फार मोठी योगदान आहे 

व्हायचा, त्यांनाही त्रास व्हायचा 
कधी कामाचा भार पडायचा 
कधी एकटेपणी गाडा रेटावा लागायचा  
त्यातच कधी औषध साठा उथीरा यायचा 
तर कधी अवेळीच यायचा 
त्यावेळी आलेल्या माल उतरवून घेणे 
व्यवस्थित ठेवणे पुन्हा रचने 
यात त्यांना  ड्युटी अतिरिक्त 
कित्येक तास द्यावे लागायचे 
पण कर्तव्याचा हा भाग त्यांनी 
सहज स्वीकारला होता 

दुसऱ्या दिवशी फक्त 
साहेब संध्याकाळचे सहा सात वाजले 
आणि घरी जायला दहा वाजले 
एवढे बोलली की विषय संपला 

त्या बदल्यात काहीही मागणी नसायची
काही Favour किंवा मोबदल्याची अपेक्षा नसायची 
त्यांना फक्त सोबतीला 
प्रामाणिक कष्टाळू कामगार लागायचे 
त्यासाठी त्यांचा हट्ट असायचा
ती पूर्तता झाली की मग ते खुश असायचे

 शाळेतील फर्मासी डिपार्टमेंट चालवणे
( सोबत ऑफिसही )
एक भयंकर दिव्य होते 
तेथे माल ठेवणे रचने वितरण करणे 
मोठी परिक्षाच होती
त्यांनी ज्या पद्धतीने केले त्यासाठी त्यांना सलाम 

कितीही चांगले अन मोठे काम असले
तरी ते काम एक मोठी जबाबदारी असते 
जबाबदारी सोबत थोडी 
काळजी टेन्शन वैताग हा येतोच येतो 
आणि निवृत्तीचे वेध लागताच
मन अधिकच काळजीपूर्वक वागू लागते 
त्या दिवसाची वाट पाहू लागते 
मी निवृत्त झालो तेव्हाच महाजनांचा लागलेले 
हे वेध मला जाणवत होते 
साहेब आता माझे फक्त दीड वर्ष राहीले 
ते म्हणायचे .
आणि आता तो महिना उजाडला आहे 
फक्त दहा दिवस उरले आहेत 
शर्यत संपली आहे फक्त 
शर्यतीतील शेवटच्या दोरीला 
हात लावायचे राहिले आहे

नंतर ते काम करतील न करतील माहित नाही 
पण ते कुठलेही टेन्शन नसलेले 
शांत निरामय आरोग्य संपन्न जीवन 
त्यांना मिळावे हीच माझी परमेश्वरा जवळ प्रार्थना
 धन्यवाद

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

आजी (श्रद्धांजली)

खेडेकर आजी (श्रद्धांजली)
*********************
एक प्रश्न लांबलेला 
उत्तरात सामावला 
घरा दारास वाहिला 
एक दीप शांत झाला ॥
खुणा तिच्या कर्तृत्वाच्या 
विटेवरी लिहिलेल्या 
स्मृती तिच्या कणोकणी 
फेर धरुनी राहिल्या ॥
सरते गीत कळते 
तेव्हा वय त्रास देते 
चांदणे ते नभातले 
पण काय शिळे होते ॥
दोन दिस एकाचे ते 
करूनिया वर्ष गेले 
हे गणित कुणाचे ते 
नाही कुणास कळले ॥
अस्तित्व ते आशिषाचे 
जरी आता लोप झाले 
कणोकणी तेच पण 
आशिर्वचनी उरले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

डायाभाई श्रद्धांजली


डायाभाई 
**********
कळले आजच की  डायाभाई गेला 
सहकारी आणखीन एक हरपला 

गर्द करडे केस  दाढी खुंट वाढलेला
वर्ण सावळा जरा वाकला ढगळ वस्त्रातला 

सदा उपयोगी माणूस तो कॅजुल्टी मधला
जाता जाता पण जरा त्रास देऊन गेला

शॉर्टेज मध्ये माणसे लागायची फिरवायला 
स्वीपरचे वार्डबॉय अन् ड्रेसर करायला

हे ड्रेसरचे काम त्याला भारी आवडायचे 
असतीलही त्यात काही हिशोब जरी त्याचे 

पण चिडला की मग हेका नाहीच सोडायचा
बरीच समजूत घालून मग जरा कुठे ऐकायचा

पण चकरा मारून ऑफिसला कंटाळला 
नव्हते फारसे येणे ते काय माहित त्याला 

शिव्या झाल्या देवून आरडाओरड करून 
क्लार्क लोकांचा गेला साऱ्या उद्धार करून 

हवाहवासा डाया मग नकोसा वाटू लागला 
पैसा ही वस्तूच बनलीय आदर घालवायला 

येणे नाही कळताच तो थोडा थंडावला 
हळू हळू यायचा मग बंद होवून गेला

ती टीम तेव्हाची माझ्या कॅजुल्टीतली 
स्कोअर संपवून आता जावू लागली

डायाची ती साथ आठवत सहकार्य तेव्हाचे  
श्रद्धांजली सोबत मानतो आभार मी त्याचे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, २७ जून, २०२४

पूनम साखरकर

पूनम साखरकर सिस्टर 
************
1.फार कमी व्यक्तींचे नाव तिच्या व्यक्तिमत्त्वाला समर्पक असते . पण ते किती असावे ? त्यात थोडाफार फरक असतोच पण पुनम सिस्टर यांचे पूनम साखरकर हे नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाशी 100%  अनुरूप आहे .
पूनम सिस्टराचे वागणे जगणे पौर्णिमेच्या चंद्रासारखे शीतल आहे . तिचे बोलणे लाघवी मधूर आहे . जिचे पाहणेही हसरे व निर्व्याज आहे नम्रता शांतता तिच्याकडे मुक्कामालाच आले आहेत 
त्यांचे काम एकदम परफेक्ट असते . ते काम कधीही बळेच केलेले नसते वेळ काढू पणे केलेले नसते .अगदी मनापासून जीव ओतून ते काम झालेले असते . अगदी आखिव रेखीव आणि याबद्दल त्यांना थोडाही गर्व झालेला दिसत नसे .
त्यांचे अगोदरच नाव काटकर तेही चांगलंच पण देवाने विचार केला असावा की त्यांना अजून चांगले , अनुरूप नाव द्यावे , म्हणून मग त्यांची गाठ पडली साखरकराशी . खर तर हे साखरकरांचेच भाग्य आहे .साखरेतील मधुरता शुभ्रता हवेपणा त्यांच्यामध्ये एकवटलेला आहे . 
*1
2 बाकी पूनम सिस्टर चे माझ्यावर फार ऋण आहेत मी व्ही शांताराम आरोग्य केंद्रामध्ये ज्या वेळेला एफटीएमओ होतो त्यावेळची ही गोष्टी आहे . मला त्या पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या कामाचा फारच कंटाळा आला होता .
खरंतर त्यावेळी मी नुकताच डॉक्टर झालेलो  ज्ञानाने भरललो रुग्णसेवेला आतुरलेला तरुण होतो आणि  मला ती आकडेमोड करणे मस्टर पहाणे रिपोर्ट करणे असली कागदी कामे आवडत नव्हती
त्यावेळेला पूनम सिस्टरांनी ते ओझे इतके सहजपणे उचलले  की मला त्याकडे पाहावेच लागले नाही मग मी क्लिनिकल कामांमध्ये रमून गेलो अन्यथा मी महानगरपालिकेला तेव्हाच राम राम ठोकला असता .
 खरंच संगतो अडीच वर्षासाठी देवाने मला एक ॲडिशनल बहिण दिली होती . त्याकाळी मला कडकडीत एकादशीच्या उपवासाचे वेड लागले होते आणि मग दुपारी मला हापो ग्लायसेमिया व्हायचा माझा चेहरा उतरायचा पण मी ठामपणे खायचं टाळायचो मग सिस्टर  काय करायच्या मला न सांगता हळूच एनर्जीची बाटली मागवायच्या आणि उघडून माझ्या समोर ठेवायच्या आणि मग माझा कडकडीत उपवास मवाळ होवून जायचा .
**2
3 माझा चेहरा तरतरीत व्हायचा . त्या त्यांच्या प्रेमाने आग्रहाने  माझ्या रक्तात पुन्हा साखर खेळू लागायची .साखरकराचे साखरकर नाव सार्थ व्हायचे
असे दोन-तीन वेळा झाले मग मी उपास करायचे सोडून दिले
 त्यांचे आपल्या आईवर फार प्रेम होते की आईची त्यांच्यावर फार प्रेम होते मला माहित नाही पण गांधी रुग्णालयाच्या तुटलेल्या भिंतीवरून त्यांचा डबा देणारी ती प्रेमळ आई माझ्या मनचक्षूवर  कायमची कोरली गेलेली आहे .
आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांभाळून घ्यायची त्यांची हातोटी ही विलक्षण आहे कदाचित मला जो काही थोडेफार स्टाफ सांभाळता येऊ लागला ते त्यांच्याकडे पाहूनच ,असे मला वाटते .
       नंतर  मला प्रमोशन मिळाले व मी हेल्थ पोस्ट सोडले पुढील तीस वर्षात पुनम सिस्टराला क्वचितच भेटलो पण विसरलो मात्र कधीच नाही कारण ज्या व्यक्ती आपल्याला आवडतात त्या सदैव आपल्या हृदयात राहतात
 जेव्हा जेव्हा सहकारी स्टाफचा विषय निघत असे तेव्हा मी न चुकता पुनम सिस्टराचे नाव घेत असे 
*3
4 सी वाज द बेस्ट .अँड सी इज द बेस्ट
असे मला नेहमीच वाटते .असं म्हणतात आपण केलेल्या पुण्याचे फळ म्हणून चांगली माणसं आपल्या जीवनात येतात मला जीवनाला एक अर्थपूर्ण आयाम देतात .
मी काय पुण्य केले मला माहित नाही म्हणून मला पुनम सिस्टर अडीच वर्षासाठी का होईना पण भेटल्या आणि मी काय पाप केले ते मला माहित नाही म्हणून पुनम सिस्टर फक्त अडीच वर्षच माझ्यासोबत होत्या .
पण ते अडीच वर्ष किती मूल्यवान होते हे मला माहित आहे त्यासाठी मी पूनम सिस्टरांचा आणि जीवनाचा फार फार ऋणी आहे .
पुढे जन्म असतो माहित नाही पण असेल तर पुनम सिस्टर माझ्या खरोखरीच्या सिस्टर ' म्हणजे बहीण म्हणून मला मिळाव्या ही देवाकडे प्रार्थना .

 तसेच निवृत्तीनंतरचा काळ त्या सुखात समाधानात आनंदात राहो त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा व प्रार्थना . धन्यवाद .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .4
☘☘☘☘ 🕉️ 

फ्रेम आणि चित्र

फ्रेम आणि चित्र  ************ जेव्हा जेव्हा कानी सखी शब्द येतो  तेव्हा तेव्हा समोर तुझा चेहरा येतो  बाकी छान पैकी चालू आहे जिंदग...