गुरुवार, १५ जून, २०२३

अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ

अधिक देखणे तरी निरंजन पाहणे  भावार्थ
********************************
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय ।
या जगात जे पहायचे ते पाहिले, जे जाणायचे ते जाणले, आता हे जग आणि त्याच्या पलीकडे काय आहे.तर हे जे पाहायचे आहे ते काय आहे? तर ते निरंजन आहे !  निरंजन म्हणजे ज्याला काजळी नाही असे तत्व प्रकाशमान तेजस्वी ज्ञानस्वरूप किंवा आपले निज स्वरूप ते हे निरंजन !त्याला आपण ज्ञान असेही म्हणू शकतो, तर ते पहायचे मनी आले आहे
त्यासाठी ज्ञानदेव योगीराज श्री निवृत्ती देवांना विनवणी करीत आहेत 

देह बळी देऊनी साधीली म्यां साधनी तेणे समाधान मज जोडले वो माय ।
ज्ञानदेव महाराज म्हणत आहेत की हे ज्ञान ही स्थिती प्राप्त होण्यासाठी मी देहबळी दिला आहे. देह बळी देणे म्हणजे देहात्म भावाचा बळी देणे. मी शरीर आहे, हा भाव सोडणे ,सुटणे देह बळी देणे म्हणजे गुरु सेवा करता करता सेवेचा परमावधी गाठणे, देह बळी देणे म्हणजे ममत्व सुटणे. तर हे असे साधन मी केले आहे असे महाराज सांगत आहेत आणि ते पुढे म्हणतात की त्यामुळे मला अतिव समाधान लाभले आहे समाधान अशी  स्थिती आहे की जिथे हवे पणाचा अंत झालेला असतो आणि नको पणही अस्तित्वात नसते. आपले अस्तित्व आणि त्या भोवती जी परिस्थिती असते त्यात मन निवांत बसलेले असते ,निवांत झालेले असते. तो निवांतपणा कशानेही ढवळत नाही.

अनंगपण फिटले माया छंदा साठवले सकळ देखिले आत्मस्वरूप वो माय ।
महाराज पुढे म्हणतात की या साधनेमुळे माया छंदात साठवलेले माझे अनंगपणा सुटले 
अनंग म्हणजे ज्याला अंग नाही असा. अनंग म्हणजे कामदेवही, म्हणजेच आपल्या अनंत  कामना , वासना , इच्छा हे देह नसूनही आपल्यात आहेत धन कीर्ती यांची हाव हे अनंगाचे विस्तारित रूप आहे आणि या अनंग पणाचा उद्भव मायेमुळे होतो. अर्थात मायेच्या नादी लागल्यामुळे होतो. ते अनंगपण मायेच्या छंदासकट सुटले, त्यामुळे मला आत्मरूपाचे संपूर्ण दर्शन झाले,ते सकळा ठाई ते वसलेले दिसले

चंदन जेवी भरला अस्वस्थ फुलला तैसा म्या
देखिला निराकार वो माय ।
ज्ञानदेव महाराज म्हणतात मी तो निराकार पाहिला निराकार आणि पाहणे हे बोलणेच विरुद्धार्थी आहे. तर मग तो मी पाहिला हे कसे? तर जसा चंदन जसा सुगंधाने भरून जातो आणि अश्वस्थ पानांनी भरून जातो तसा मी हा निराकार पाहिला आहे. चंदनात चंदनाचा गंध ओतप्रोत भरतो, कणकणात घमघमात सुटतो,त्याच्यामधला तो गंध तो फक्त अनुभवतो. अश्वस्थ जेव्हा हिरव्या कोवळ्या पानांनी बहरून येतो ,पान नि पान लसलसत असते, झळाळत असते ,चैतन्याची पखरण करत असते, त्याच्याकडे पाहताना देहभान उरत नाही त्याचे ते बहरणे त्याच्या नकळत होते. व तो असतो ते केवळ फुलणे होऊन असतो, ते फक्त अनुभवणे असते. तसे हे निराकार पाहणे, हे फक्त अनुभवणे आहे आणि हे ज्ञान झाल्यावर हा अनुभव आल्यावर पुढे. .

पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी वो माये ।
मनाची अशी स्थिती होते व ते मन म्हणते की आता पुरे हे जग , हा प्रपंच, या जगाचे ज्ञान, या जगाचा अनुभव, जणू त्याचा मनाला वीट येतो. ते अर्थशून्य वाटते. तो जो निजानंद आहे तो जो आत्मस्वरूपाचा आनंद आहे त्यातच कायम बुडून राहावे ही मनाची अवस्था होते.

ऐसा ज्ञानसागर रखुमादेवीवरु विठ्ठली निर्धारू म्या देखिला वो माय ।
ज्ञानदेवांना हा जो अनुभव झाला आहे, तो निर्गुण निराकाराचा ,चैतन्याचा ,परब्रम्हाचा आहे .परंतु ज्ञानदेव महाराज त्या ज्ञानाला ,सगुणात आणत आहेत आणि निर्धारपूर्वक सांगत आहेत , तो मी पाहिलेला ,जाणलेला ज्ञानसागर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून रखुमादेवीवर विठ्ठलच आहे.

भावार्थ.
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...