सोमवार, १२ जून, २०२३

प्रभू बा

प्रभू बा 
******

आज मज भेटली रे  मूर्तीमंत भगवती 
खोळ बुंथी पांघरुनी आली जी मनुष्याकृती ॥

 चैतन्याची दिव्य ज्योत अवतरे भू वरती 
मंत्र मुग्ध झाले चित्त हालती ना नेत्र पाती ॥

ते मंद मोहक हास्य निर्मळ प्रेमळयुक्त 
ते बोल नीट मोजके ऐकून तोषती भक्त ॥

डोईस शोभते वस्त्र गळ्यात रुळे रुद्राक्ष 
नासिके चमके नथ पाझरती स्नेह अक्ष ॥

ते तेज तपाचे मुखी ते हस्त आशिष देती 
भेटली गंगा मजसी पातलो भाग्य मी किती ॥

मी मागितले आशिष होऊ दे दीप प्रदीप  
अंतरात खोल जात रंगावे या साधनेत ॥

मग उंचावून हात वदे माय ते होईल 
विक्रांत होय कृतार्थ भेटले प्रसाद फळ ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...