बुधवार, २१ जून, २०२३

पाहते पाहणे

पाहणे पाहते
**********
पाहणे पाहते सांडूनी निरुते 
पाहीलिया त्याते 
तूचि होशी ॥
तोचि तू आपण तत्व ते तू जाण 
 न लगे साधन 
आन काही ॥
भानुबिंबे विन भासले तम 
ज्ञानदेव वर्म 
अनुवादला ॥
********
कुठलीही गोष्ट पाहायची असेल तर त्यामध्ये मी पाहायची वस्तू तो पाहणारा आणि पाहण्याची क्रिया ही तीन गोष्टी लागतात 
परंतु ज्ञानदेव महाराज म्हणतात की पाहणे आणि पाहते सांडून पूर्णपणे तू जर त्याला पाहिले तर तो तूच होशील.
परमात्मा तत्व पाहायचे असेल तर त्या ठिकाणी हा पाहणारा हरवून जायला हवा. पाहणे सुद्धा नष्ट व्हायला हवे .ज्ञान आणि ज्ञाता याचा निरास झाला पाहिजे.
 आणि एकदा तुला तुझे स्वरूप म्हणजे  तो तूच आहे हे कळले की मग आणखीन काही साधन करायची गरज नाही 
कारण जोपर्यंत भानुबिंब म्हणजे सूर्य नसतो तोवरच अंधार असतो भानुबिंब उगवल्यावर अंधार नावाची गोष्ट ही अस्तित्वात नसते.
 त्याप्रमाणे परमात्मा सूर्य ,परमात्मा रूपी ज्ञानाचा उदय झाल्यावरती इतर साऱ्या अहंकारादी वृत्ती त्यावर आधारलेले ज्ञान याचा आपोआपच नाश होतो 
हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उलगडून सांगत आहेत.

सामान्य माणसाला ही गोष्ट अशक्यप्राय वाटते कारण तसा प्रयत्न करू केल्यास त्याला ते साध्य होत नाही किंवा नेमके काय आणि कसे करायचे हेच कळत नाही. त्यामुळे महाराजांचा हा अभंग त्याला साधनेच्या अंगाने पाहता दुर्बोध वाटू शकतो परंतु नीट पाहिले असता सर्व साधनांचे सार या अभंगात आले आहे. अगदी सुरुवातीला ध्यानामध्ये बसल्यावर, शांतपणे बसल्यावर आपण आपले डोळे मिटल्यावर पाहणे सुरू होते अर्थात हे पाहणे आतमधले असते. तिथे स्मृती म्हणजे आठवणी विचार शब्द चित्र या विविध प्रकाराने मन डोळ्यासमोर नाचू लागते. तिथे आत मध्ये पाहणे चालू राहते आणि पाहणारा त्यामध्ये हरवून जातो म्हणजे एकरूप होतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम पाहणे आणि पाहणारा या मध्ये एक दरी,भेद निर्माण होणे आवश्यक असते. म्हणजे पाहणारा हा त्या पाहण्यामध्ये रस न घेणारा त्यात न रमणारा असा  उपरा किंवा दृष्टा झाला की ती पाहण्याची क्रिया संपूर्णतः बदलते मग ते निखळ पाहणे चालू राहते. त्या पाहण्यात पाहणारा अजिबात स्वतःला विरघळू देत नाही मग ते पाहणे हळूहळू निरस होत जाते. त्याच्या लाटा कमी होऊ लागतात. आणि फक्त पाहणारा शिल्लक उरतो. पाहणे आणि पाहणारा आहे तसे पाहता वेगळे नसतात. त्यामुळे पाहणारा हा पाहणे नसताना च्या अवस्थेत गेल्यावरती जे स्वरूप असते ते आत्मस्वरूपच असते 
त्या ठिकाणी मी पण नसते केवळ शुद्ध स्वरूप अस्तित्वात असते तेच परमात्मा तत्व.
सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे अंधाराचा नाश आपोआपच होतो किंबहुना सूर्याचे अस्तित्व म्हणजेच तमाचा निरास .त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर सर्व ज्ञान अज्ञान विरून जाते हे ज्ञानेश्वर महाराज या अभंगांमध्ये आपल्याला उलगडून सांगत आहेत.

विक्रांत प्रभाकर तिकोणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...