****
क्षणभर टिकतात
काही काळ दिसतात
अन जसे निर्माण होतात
तसे अस्तास ही जातात
कधीतरी कुठेतरी कुणी
कुठल्यातरी दंतकथेत, पुराणात
गोष्टीच्या वा इतिहासाच्या
पुस्तकात जाऊन बसतात
जसे की
विक्रमादित्य चंद्रगुप्त अशोक छत्रपती
पुष्यमित्र शुंग पौरस सिकंदर मिलिंद
सातवाहन गुप्त चालुक्य यादव
यवन मोगल फ्रेच इंग्रज पोर्तुगीज
वाढवाल तेवढी यादी वाढते
तर मग तुम्ही
तुमच्या आणि आमच्या साहेबाचं
काय घेऊन बसलात
उगवत्या सूर्यास रोज नमस्कार मिळतात मावळत्या सूर्या सर्वच निरोप देतात
मी कुणाचातरी साहेब आहे म्हणून
मला नमस्कार मिळतात
माझे कुणीतरी साहेब आहेत म्हणून
माझे नमस्कार त्यांच्याकडे जातात
प्रत्येक साहेबाच्यावर एक साहेब असतो
प्रत्येक जण हुकूम वाहत असतो
सार्वभौमत्वाचा बुडबुडा तर क्षणिकच असतो
खरंतर सत्ता आहे तिथेच असते
एक मुखवटा घेऊन उभी असते
पण त्या मुखवट्या खालील
चेहरे मात्र सतत बदलत असतात
सत्ता कधी मुकादम होते
तर कधी कमिशनर होते
कधी सचिव होते तर
कधी मंत्री पदावर बसते
कशीही असो कुठलीही असो
पण सत्ता प्रत्येकालाच प्रिय असते
कारण सत्ता हे अहंकाराचे अत्यंत
मोहक अन व्यापक रूप असते
एक लाट वर येते
एक लाट खाली जाते
जीवनाचे चक्र वाहतच असते
पण त्या लाटेवर स्वार व्हायला
प्रत्येक अहंकाराला आवडत असते
पण अधिकाराची हरेक लाट
त्या अहंकारा सकट बुडत असते
सत्तेवर अधिकारावर असूनही
ज्याला या अहंकाराच्या लाटेची
जाणीव असते
त्याला मात्र ती कधीच बुडवत नसते.
त्याचेच त्या अथांगाशी नाते जुळलेले असते.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा