सोमवार, १२ जून, २०२३

कौर सिस्टर

कौर सिस्टर 
*********
आपल्या मनावर 
आपल्या चांगुलपणावर 
आपल्या प्रामाणिकपणावर 
ठाम विश्वास असलेली 
आपल्या कर्तव्यदक्षतेचा 
अभिमान असलेली 
आपल्या नियमिततेशी 
तडजोड न करणारी 
या सर्वातून निर्माण होणाऱ्या 
गर्व आणि दंभाला 
पायाखाली ठेवणारी 
कौर सिस्टर 

सर्वांशी प्रेमाने वागूनही 
नियमाप्रमाणे काम करूनही 
क्वचित कोणी त्यांना 
टोचले  तर दुखावले तर 
सात्विक संतापाने 
त्या घटनेला त्या व्यक्तीला 
भिडणारी बेधडक स्वाभिमानी 
रणरागिणी कौर सिस्टर

कुठलेही काम छोटे नसते 
असे लोक म्हणतात 
पण  ते इवले तरीही  
कष्ट साध्य काम 
त्या सहज करून दाखवतात
त्या हे वाक्य  जणू जगतात

रुग्णालयाचे प्रत्येक काम 
ते स्वतःचे समजतात
त्यासाठी कुठल्याही ऑफिस चे
इंजिनीयरच्या केबिनचे 
दरवाजे ठोठावायला त्यांना 
कमीपणा वाटत नाही

ती त्यांची कामावर असलेली प्रीती कामगाराविषयी असलेल्या स्नेह 
आणि कष्ट करण्याची तयारी 
या गोष्टी त्या जन्मजातच 
घेऊन आल्या आहेत असे वाटते

 वरवर तिखट बोलणारी 
कधी खरडपट्टी काढणारी 
त्यांची वाणी 
स्वतःसाठी  कधीच काही मागत नाही 
मैत्रिणीशी मोकळेपणा 
आळशासोबत द्वाडपणा 
नाठाळाशी तापटपणा 
अन्यायाशी प्रतिकार करत 
आहे त्याचा स्वीकार करत 
जीवनावर  प्रेम करत 
आपल्या ड्युटीला सादर होतात
सदैव वरिष्ठांचा आदर करतात

या अशा अनेक गुणांनी युक्त 
कौर सिस्टर 
आमच्या  हॉस्पिटलमध्ये 
जवळजवळ पूर्ण सर्विस 
त्यां करीत राहिल्या 
मी त्यांना गेली वीस वर्षे तरी ओळखतो 
या वीस वर्षात 
कशाशी तडजोड न करता 
आपली नेकी आणि सत्व
आपले कर्तव्यनिष्ठा न हरवता 
भर प्रवाहात 
प्रवाहाची भीती न बाळगता
प्रवाहात उभे राहत 
जगणारी उर्मी म्हणजे काय
ते दाखवणारी व्यक्ती म्हणजे
कौर सिस्टर 

अन अशी दृष्टी असलेल्या
प्रत्येक व्यक्तीसाठी  त्या 
प्रेरणास्त्रोत आहेत
त्यांना पाट्या टाकणारी 
माणसं आवडत नाहीत 
त्या स्वतःही कधी पाट्या टाकत नाहीत
त्यांना खोटं बोलणारी 
माणसं आवडत नाहीत 
त्या स्वतःही कधी खोटं बोलत नाहीत
 त्यांना राजकारण आवडत नाही 
राजकारणीही आवडत नाही 
त्यांना फक्त माणुसकी 
माणूस धर्म हेच प्रिय आहे 

त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे 
कधी गैरसमज होतात 
कधी प्रियजन दुरावतात 
पण जे त्यांना जाणतात 
ते पुन्हा त्यांच्याजवळ येतात 
त्या आहेत 
कणखर पण मऊ  
तापट पण प्रेमळ 
कठोर पण स्नेहळ 

तर आता त्यांना आले आहे प्रोमोशन 
त्या रुग्णालयातून जाणार 
पण त्यांच्या जाण्याने 
रुग्णालयाची प्रचंड हानी होणार
माझी तर होणारच
पण त्यांच्या नवीन पदावर  चालल्यात 
प्रमोशन वर चालल्यात
म्हणून त्यांना शुभेच्छा देतो 
आणि त्या नवीन ठिकाणीही 
त्या आपला छाप उमटवणारच 
यात शंका नाही
ऑल द बेस्ट सिस्टर 
*****
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...