रविवार, ११ जून, २०२३

पाऊस ऐकतांना

पाऊस ऐकतांना
*******
ऐकतांना पाऊस मी 
देहात माझ्या नसतो 
तो नाद ओंकारागत 
खेचून मजला नेतो 

ते नसे टपटपणे 
पानांचे सळसळणे 
कौलांच्या छपराखाली 
लय एक वा धरणे

तो पडता रव कानी 
निशब्द जग हे होते 
हृदयाच्या तालासंगे 
विश्वच स्पंदित होते 

ते वारे ओले गंभीर 
सोसाटत वाहणारे 
होत एकरूप श्वासी 
चिद आकाशात विरे 

हे नाद अनुसंधान 
केल्या वाचून घडते 
ते द्वार महासुखाचे 
मजसाठी उघडते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...