सोमवार, १९ जून, २०२३

गिरनार वारी

गिरनार वारी
**********
नसूनही गर्दी हाकलती साधू 
गिरणार बंधू शिखरचे ॥१
कुणी एक नवा फोटो काढू जाता 
नरकाच्या वाटा तया दावी ॥२
कोणी धमकावे फेकीन तो फोन 
किंवा आपटेन धरूनिया ॥३
कोणा निळे शाप कळल्या वाचून 
विचारा तो दीन होय जीवे ॥४
सांगण्या कारण जावे सांभाळून 
अपेक्षा सोडून सौजन्याची ॥५
क्षणभर पहा दत्त चरणाला 
श्रम वेचलेला विसरून ॥६
होऊन चिवट हळू सरकत 
दत्त निरखत पुढे चला ॥७
बोलू द्या साधूला आणि शिपायाला 
कान त्या शब्दाला देऊ नका ॥७
जिथे असे देव तिथेच बडवे 
आम्हा हे तो ठावे सालो साल ॥८
ढळल्या वाचून गिरणार भक्ती 
जावे वहिवाटी  तेथचिया ॥९
नाही असे नाही खंतावतो जीव 
परी राही भाव अभंग तो ॥१०
बोलाव रे दत्ता गिरणार गावा 
क्षणभर जीवा भेटी देई ॥११
विक्रांत संसारी कामी क्रोधी जरी 
तुझ्या पायावरी सरो वारी ॥१२
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...