रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

नाटक

नाटक
*****
कैसे या मनाला स्थिर मी करावे 
नामी गुंतवावे कळेची ना ॥१

कैसे या मनाला ध्यानी बसवावे 
स्वरूपी भरावे कळेची ना ॥२

किती या मनाला नित्य समजावे 
बोधी ठसवावे जमेची ना ॥३

मनोबोध झाला दासबोध झाला 
ज्ञानदेवी याला नित्य नेले ॥४

संतांचे अभंग चरित्र पावन 
नेऊनिया स्नान घडविले ॥५

परी त्यात करी रसाचे ते पान 
वरवर छान रमतसे ॥६

दत्ता अवधूता शरणागतीचे
नाटक हे याचे दिसे मज ॥७

नाटक सुटेना छंद ही मिटेना 
छळे रीतेपणा अंतरीचा ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...