सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

संसार

संसार
******
तसाही संसार असतो नासका
परंतु नेटका करावा रे ॥१

सुख संसाराचे चार दिवसाचे 
ओझे वाहायाचे तदनंतर ॥२

येतसे मोहर पडे भूमीवर 
फळे दोन चार देऊनिया ॥३

नवी नवलाई तिला असे अंत 
करावी ना खंत जाताच ती ॥४

पुढे भांडाभांडी होते रुसाफुगी 
तरीही जिंदगी चालायची ॥५

सारे सुख इथे कुणाला मिळाले 
हातात भेटले आकाश फुल ॥६

पाहू गेले तर असतो संसार 
खरेच जुगार हरण्याचा ॥७

पण ती ही खेळी मानता दैवाची 
अवघ्या दुःखाची धार जाते ॥८

हरण्याचे दुःख जिंकण्याचे सुख 
होऊनी कौतुक उरते रे ॥९

असे तोवर तो शेवटचा जागा 
प्रेमाचा धागा धरावा रे ॥१०

अंती देवा हाती प्रारब्धाची गती 
मानुनिया शांती मनी धरी ॥११

अर्थाविना इथे काही न घडते
जग हे चालते शक्ती हाती ॥१२

करून सायास सारे जुळण्याचे
दुःख तुटण्याचे करू नये ॥१३

आणि स्वाभिमान मनात ठेवून 
छळाचे विदांण साहू नये ॥१४

जगण्यावाचून सुंदर आणिक
जगात अधिक नसते काही. ॥१५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...