शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

कथा विजयाची .


कथा विजयाची .
************
जीवन कधी असते उभे
हातात घेऊन शस्त्र धारदार
एक घाव भरण्याआधीच 
होतो दुसरा तीव्र वार ॥

शत्रु समोर नसतो कधी 
नीट कळत नाही हत्यार 
कारण कळत नाही कधी 
तरी करावा लागतो स्वीकार ॥

धन जाते आणिक पतही
आपलेही मग परके होतात 
कधी मानले होते जीवलग 
मित्र तेही पाठ फिरवतात ॥

मन होऊन जाते विदीर्ण 
आक्रोश उमटतो अस्तित्वावर
पण ती उर्मी जगण्याची
साहते सारे होत झुंजार ॥

अर्धी नीज अर्धी भाकर 
कष्टाला नुरतो सुमार 
यत्नदेव तो देहामधला 
प्राक्तनाच्या नेतो पार ॥

थकतो शत्रू अनामिक तो
सोडून देतो मग सारे घात 
विद्ध तरीही विजयी जीवन 
ध्वजा उभारते उंच नभात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...