शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

चित्र काढणे

चित्र काढणे
*********"
तू आणि मी काढलेली चित्र 
फाटतात विटतात हरवून जातात 
अस्तित्वाचा अंशही मागे न ठेवता 
कधी कधी तर त्यांना 
चार डोळ्यांचे दर्शनही घडत नाही 
तेवढी भाग्यवान अन मौल्यवान नसतात ती 
पिकासो व्हिन्सेंटगॉग लिओनार्दो मायकल इंजीलो  सारखी मिलियन डॉलर होणारी 
किंवा रविवर्मा अमृता जेमिनी हुस्सेन
दलाल आबालाल वा मांढरेच्या चित्रांसारखी 
अंतर्बाह्य सुखवणारी वा हादरविणारी.

तशी आपली चित्रकला संपली
त्या चपट्या रंगाच्या डब्यात क्रेयानच्या खडूत
व कॅमलिनच्या ट्यूबच्या खोक्यात
तरीही ते रेघोट्या मारणे चालूच राहते 
कधी वहीच्या पाठीमागे 
कधी कागदाच्या तुकड्यावर 
कधी फाईलीच्या माथ्यावर 
कधी चक्क कोऱ्या कागदावर कॅनवासवर 
खरंतर त्या चित्राला काहीच महत्त्व नसते 
महत्त्व असते ते चित्र काढण्याला 
कारण चित्र काढतच नसतो आपण ..
चित्र काढले जात असते ते एक घडणे असते. 
डूइंग चा अंत होतो तिथे
अन हॅपनिंगचा प्रांत सुरू होतो 
आणि हॅपेनिंग मध्ये नसते मन 
म्हणून नसतात भावना नसतो काळ 
असलास तर असतो वर्तमान केवळ 
बोटात हातात डोळ्यात एकवटलेला 
तरीही शरीर नसलेला 

तेव्हा ती उत्स्फूर्तता सृजनता भेटते आपल्याला .
ते चित्त लहान शिशूचे न शोधता
 पुन्हा गवसते आपल्याला 
आनंदाचा एक झरा घेरून राहतो जीवनाला. 
ते चित्र काढणे एखादी
कविता लिहिण्यासारखे असते 
पदर पसरून प्राजक्ताच्या झाडाखाली उभे राहणे 
आणि फक्त ती  फुल झेलणे 
ती मनात पडणारी शब्द फुले
त्यांनाअलगद अक्षरात मांडणे 
तिथे ही ते वाट पाहणे थांबणे
किती अप्रतिम दुर्लभ विलक्षण असते 
ते ही एक चित्र काढणेच असते 
कारण ते ही हॅपनिंग असते
(त्यामुळे कवी चित्र काढू लागला 
किंवा चित्रकार कविता लिहू लागला 
तर मला फारसे नवल वाटत नाही.)
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...